Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Jalgaon News किडनी ट्रान्सप्लांटसाठी धावून आले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; चार्टर्ड विमानातून रुग्ण महिलेला मुंबईत दाखल

– विलंबाचे जीवनदानात रूपांतर; संवेदनशीलतेचा अनोखा प्रत्यय


जळगाव न्यूज | जळगाव विमानतळावर उड्डाणास विलंब झाला अन्‌ तोच विलंब एका गंभीर रुग्ण महिलेच्या आयुष्यातील निर्णायक क्षण ठरला. किडनी ट्रान्सप्लांटसाठी मुंबईला जाण्याची तातडी असलेली शीतल पाटील या महिलेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःच्या चार्टर्ड विमानातून मुंबईत नेऊन त्वरित रुग्णालयात दाखल केलं.

उपमुख्यमंत्री शिंदे काल मुक्ताईनगर येथे संत मुक्ताबाई पालखी प्रस्थान सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आले होते. कार्यक्रमानंतर ते मुंबईकडे परतण्यासाठी जळगाव विमानतळावर पोहोचले होते. त्यावेळी त्यांच्या उड्डाणास काहीसा विलंब झाला आणि तोच विलंब शीतल पाटील या महिलेसाठी संजीवनी ठरला.

शीतल पाटील या जळगाव जिल्ह्यातील असून किडनी विकाराने त्रस्त आहेत. त्यांची शस्त्रक्रिया मुंबईत नियोजित होती. मात्र विमान चुकल्यामुळे त्यांचं तात्काळ मुंबईत पोहोचणं कठीण झालं होतं. ही बाब कार्यकर्त्यांमार्फत मंत्री गिरीश महाजन यांच्या कानावर गेली. त्यांनी त्वरित उपमुख्यमंत्र्यांशी संपर्क साधत शीतल पाटील व त्यांच्या पतीस मुंबईला घेऊन जाण्याची विनंती केली.

शिंदे यांनी या विनंतीला लगेच सकारात्मक प्रतिसाद दिला. “माझ्या लाडक्या बहिणीला मी मुंबईला घेऊन जाणारच,” असे सांगत त्यांनी दोघांनाही चार्टर्ड विमानातून सोबत घेतले. प्रवासादरम्यान त्यांनी शीतल पाटील यांच्याशी संवाद साधत त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांची चौकशी केली. मुंबईत पोहोचल्यानंतर त्यांच्यासाठी विशेष रुग्णवाहिकेची व्यवस्था करत तात्काळ रुग्णालयात दाखल केले.

👥 जळगाव न्यूज WhatsApp 📲 ग्रुपमध्ये सामील व्हा - https://chat.whatsapp.com/GPfOU1xWIscHfOTnpd7ouM


या घटनेनंतर जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं की, “उपमुख्यमंत्री शिंदे हे खरोखर ‘कॉमन मॅन’साठी झटणारे नेते आहेत. त्यांची संवेदनशीलता, तात्काळ निर्णयक्षमता आणि गरजूंना मदत करण्याची वृत्ती याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला.”

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या