Ticker

🔴 BREAKING NEWS
Loading...

Ad Code

जळगावातील आदिवासींच्या उपोषणावर प्रशासनाचे पत्र; २२ सप्टेंबरला मुंबईत बैठक, उपोषण मागे घेण्याचे आवाहन

जळगाव : आदिवासी बांधवांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदानावर सुरू असलेल्या आमरण उपोषणाच्या पार्श्वभूमीवर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल कार्यालयाकडून आंदोलकांना अधिकृत पत्र देण्यात आले आहे. १५ सप्टेंबर २०२६ रोजीच्या या पत्रात शासन स्तरावर मागण्यांबाबत सकारात्मक कार्यवाही सुरू असल्याचे सांगत उपोषण तात्काळ मागे घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


आदिवासी आंदोलनावर प्रशासनाचे पत्र; २२ सप्टेंबरला दुपारी ३ वाजता बैठक, उपोषण मागे घेण्याचे आवाहन


आंदोलकांनी ९ सप्टेंबर रोजी विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाकडे सादर केले होते. त्यामध्ये ५ ऑगस्ट २०२६ रोजीचा वादग्रस्त शासन निर्णय रद्द करणे, यावल येथील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी तातडीच्या उपाययोजना करणे, तसेच गडचिरोली येथील वसतिगृहात सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची मदत आणि जखमी विद्यार्थ्यांना ५० लाख रुपयांची मदत देणे, यांसह विविध मागण्यांचा समावेश आहे.

२२ सप्टेंबरला महत्त्वाची बैठक

प्रशासनाच्या पत्रानुसार, २९ ऑगस्ट २०२६ रोजी मुंबई येथे मुख्यमंत्री यांच्या शासकीय निवासस्थानी बैठक झाली होती. या बैठकीत आदिवासी मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहातील विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या प्रतिनिधींसोबत विविध मागण्यांवर चर्चा झाल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

बैठकीत झालेल्या चर्चेनुसार विद्यार्थ्यांच्या मागण्या शासनाकडून मान्य करण्यात आल्याचे तसेच बैठकीतील निर्णयांच्या अनुषंगाने पुढील कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी तीन महिन्यांत बैठक आयोजित करण्याचे मुख्यमंत्र्यांनी सूचित केल्याचे प्रशासनाने पत्रात म्हटले आहे.

दरम्यान, २२ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजता आंदोलकांची मा. सचिव, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्यासोबत भेट घडवून आणण्यासाठी मा. आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांच्या माध्यमातून आवश्यक कार्यवाही सुरू असल्याचे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.



प्रशासनाचे उपोषण मागे घेण्याचे आवाहन

शासन स्तरावर आंदोलकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक कार्यवाही सुरू असून, संबंधित मागण्यांवर निर्धारित कालावधीत कार्यवाही करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने पत्रातून सांगितले आहे. त्यामुळे सुरू केलेले आमरण उपोषण तात्काळ मागे घ्यावे, अशी विनंती आंदोलकांना करण्यात आली आहे.

मात्र, दुसरीकडे आंदोलकांनी मागण्या प्रत्यक्षात पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याची भूमिका घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे प्रशासनाच्या या पत्रानंतर आंदोलकांची पुढील भूमिका काय असणार, याकडे लक्ष लागले आहे.

Jalgaon tribal protest, Jalgaon Adivasi protest, Jalgaon hunger strike, Jalgaon tribal agitation, Shivtirth Maidan Jalgaon, Maharashtra tribal protest, Jalgaon latest news, Jalgaon breaking news

जळगाव आदिवासी उपोषण, आदिवासी आंदोलन, शिवतीर्थ मैदान जळगाव, २२ सप्टेंबर बैठक, Jalgaon Tribal Protest, Jalgaon News, आदिवासी विकास विभाग

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

0