‘तु सुखकर्ता, तु दुःखहर्ता’ : श्री गणेशाच्या आराधनेमागील श्रद्धा, परंपरा आणि आध्यात्मिक महत्त्व
श्री गणेशाला विघ्नहर्ता आणि प्रथमपूजनीय देवता मानले जाते. सर्व शुभ कार्ये निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी श्री गणेशाय नम: म्हणत कार्यारंभ केली जातात. श्री गणेश म्हणजे साक्षात बुद्धीची देवता. गणेश हे ज्ञान, विज्ञान, विवेक आणि कलांचे रक्षक आणि अधिपती म्हणून मानले जातात. आध्यात्मिकदृष्ट्या आपल्या इंद्रियांचा गण आहे आणि मनाचा पती गणपती आहे. गणेशोत्सव काळात गणेश चतुर्थी पासून ते अनंत चतुर्दशी पर्यंत श्री गणेशाची आराधना, उपासना, प्रार्थना आणि मनोभावे पुजा- आरती करुन दररोज मोदकांदी मिष्टान्नांचा नैवेद्य दाखवून सर्वांना भक्तीभावाने प्रसाद म्हणून ग्रहण करण्यासाठी दिला जातो. सर्वांच्या घरात सुख शांती लाभो, सर्वांना आरोग्य आणि धनसंपदा लाभो, सर्वांची उत्तमोत्तम आणि सर्वांगिण भरभराट होवो अशी प्रार्थना श्री गणेशाला वंदन करून केली जाते. श्री गणेश म्हणजे सकळ विघ्नांचा हर्ता व मंगलमूर्ती असा मानला जात असल्यामुळे त्यांची पुजा घरोघरी मनोभावे केली जाते. सार्वजनिक गणेशोत्सव हा तर लोकमान्य टिळकांनी समाजात एकोपा निर्माण व्हावा व टिकून रहावा यासाठी सुरू केला, ज्याचे कालौघात फार मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला, इतका की भारता व्यतिरिक्त जगातील अनेक देशांमध्ये गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा केला जातो. हिंदू समाजात अनेक उपासना पंथ निर्माण झाले, त्यामध्ये ' गाणपत्य ' हा एक पंथ आहे, ज्याचे दैवत गणपती आहे. गणपती हाच परमात्मा असून या ब्रम्हांडाची निर्मिती त्यांनीच केली असे ह्या पंथाचे अनुयायी मानतात. श्री गणेशाच्या अनेकाविध, नानाविध प्रकारच्या दंतकथा, पौराणिक कथा आणि ऐतिहासिक कथा सर्वत्र प्रचलित आहेत. श्री गणेशावर हजारो ग्रंथ लिहिलेले आहेत. जगातील बहुसंख्य देशांमध्ये श्री गजानन विविध नावं आणि रुपांसह आजही अस्तित्वात असून त्यांचे पिढ्यानपिढ्या जपणूक आणि पूजन केले जाते. भाद्रपद शुद्ध चतुर्थीस म्हणजे गणेशाच्या जन्म दिवसांपासून या सणाला प्रारंभ होतो. गणेश देवता आणि शेतीचा हंगाम यांचा अन्योन्य संबंध आहे. पावसाला उशीर झाला तर आगामी पीकपाण्याबद्दल अनिश्चितता निर्माण होते, अशा वेळी विघ्नहर्ता श्री गणेशाची आराधना, उपासना, प्रार्थना आणि मनोभावे पूजा केल्याने पाऊस येतो व बळीराजा लगबगीने शेतीकामाला सुरूवात करतो. चंद्र आणि गणेश चतुर्थीचा संबंध जोडला गेला आहे. या दिवशी कुणी चंद्र दर्शन केले तर ते अशुभ मानले जाते. गणपती हा द्रविडांचा मुळ देव आहे. यातील उपजाती उंदराला दैवत मानून त्याची पूजा करतात. 'गण' याचा अर्थ पवित्रक आणि पती याचा अर्थ पालन करणारा. गणपती सूक्ष्मातीसूक्ष्म चैतन्यकणांचा म्हणजे पवित्रकांचा स्वामी आहे. जीवसृष्टीवर विघातक परिणाम करणाऱ्या रजतम लहरींवर नियंत्रण ठेवतो व लवकर प्रसन्न होतो तो श्री गणेश. गणेश प्रसन्न झाला की वाक्सिद्धी प्राप्त होते. गणपती हा दहा दिशांचा स्वामी आहे. त्याच्या अनुमतीविना इतर देवता पूजा स्थानी येऊ शकत नाहीत. गणपतीने एकदा दिशा मोकळ्या केल्या की ज्या देवतेची आपण पूजा करत असतो, ती तेथे येऊ शकते. गणपती वाईट शक्तींना बांधून ठेवत असल्याने सर्वप्रथम गणेशास वंदन आणि पुजा अर्चा करून शुभ कार्यास प्रारंभ केला जातो. डाव्या सोंडेच्या गणपतीची मूर्ती पुजेत ठेवली जाते. उजव्या सोंडेचा गणपती अतिशय शक्तिशाली आणि जागृत असतो. श्री गणेश पूजा करताना या गोष्टीची विषेश काळजी घ्यावी अन्यथा यांचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात. तांबड्या अथवा लाल रंगात गणेशतत्व प्राप्त करण्याची क्षमता अधिक असते यामुळे गणेश पूजेत तांबडा अथवा लाल रंगांच्या वस्त्रांचा, फुलांचा, रक्तचंदनाचा वापर केला जातो. श्री गणेशाला आठ किंवा आठच्या पटीत लाल फुले वाहावीत. श्री गणेशाला दूर्वा वहाताना नेहमी विषम संख्येत वहावीत. श्री गणेशाला प्रदक्षिणा घालताना आठच्या पटीतच घालाव्यात. श्री गणेश तत्व म्हणजे संपूर्ण सृष्टीचे मुळ अद्वैत चैतन्य आणि परब्रह्मस्वरुप गणेश होय. गणेश म्हणजे संपूर्ण विश्वाला चालवणारे सगुण निर्गुण चैतन्य आहे. गणेशाचे भौतिक शरीर हे ॐ ( प्रणव ) या आकाराचे दर्शन घडवते. बुद्धी आणि विवेकाचे तत्व माणसाला योग्य दिशा, उच्च बुद्धी आणि संयम शिकवते. मोदक हे परिपूर्ण स्थितीचे द्योतक आहे. मोदक हे ज्ञाननिष्ठा, ज्ञानरस आणि ज्ञानाद्वारे प्राप्त मुदित अवस्थेचा परिचय देणारे आहे. टिकाकारांना योग्य उत्तर देण्यासाठी मुषकाची खास नेमणूक केली आहे. गणपतीचे हे सर्व गुण धारण करून सर्व संकटांना सामोरे जाण्याची शक्ती मिळते. जय श्री गणेश. सर्व कार्येशू सर्वदा.
दिलीप श्रीनिवास तळणीकर
मो. ९३२५३१२९७४

0 टिप्पण्या