जळगाव | विशेष प्रतिनिधी उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्हा आज केवळ राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा नाही, तर राज्याच्या सत्ताकारणातील सर्वाधिक प्रभावशाली जिल्ह्यांपैकी एक म्हणून उदयास आला आहे. दिल्लीतील संसद असो की मुंबईतील मंत्रालय, जळगावच्या नेत्यांची उपस्थिती आणि प्रभाव दोन्ही ठिकाणी स्पष्टपणे जाणवतो.
सध्या जळगाव जिल्ह्याकडे केंद्रात एक राज्यमंत्री, राज्यात तीन कॅबिनेट मंत्री, लोकसभा-राज्यसभेत तीन खासदार, विधानपरिषदेत दोन आमदार आणि विधानसभेत अकरा आमदार आहेत. एवढे व्यापक राजकीय प्रतिनिधित्व महाराष्ट्रातील फारच कमी जिल्ह्यांकडे आहे.
दिल्लीतही जळगावचा दबदबा
जळगाव जिल्ह्याचे संसदेत तीन चेहरे सक्रिय आहेत.
- रक्षा निखिल खडसे – केंद्रीय राज्यमंत्री व रावेरच्या खासदार
- स्मिता उदय वाघ – जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार
- उज्ज्वल निकम – राज्यसभा खासदार
लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांत जळगावचे प्रतिनिधित्व असल्याने राष्ट्रीय स्तरावरील निर्णय प्रक्रियेतही जिल्ह्याची उपस्थिती महत्त्वाची ठरते.
मंत्रालयात जळगावची 'तिहेरी पॉवर'
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात जळगाव जिल्ह्याचे तीन प्रभावी मंत्री आहेत.
- गिरीश महाजन – जलसंपदा मंत्री
- गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री
- संजय सावकारे – मंत्री
राज्यातील महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी जळगावच्या मंत्र्यांकडे असल्यामुळे प्रशासन आणि विकासाच्या निर्णयांमध्ये जिल्ह्याचे राजकीय वजन अधिक वाढले आहे.
विधानपरिषदेतही दोन प्रभावी चेहरे
जळगावचे राजकीय बळ केवळ विधानसभा आणि लोकसभेपुरते मर्यादित नाही.
- एकनाथ खडसे – राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)
- नंदकिशोर (नंदूभाऊ) महाजन – भारतीय जनता पक्ष
विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष अशा दोन्ही बाजूंनी विधानपरिषदेत जळगावचे प्रतिनिधित्व असल्याने जिल्ह्याचा आवाज अधिक प्रभावी ठरतो.
विधानसभेत ११ आमदार जळगाव जिल्ह्याच्या ११ विधानसभा मतदारसंघांतून निवडून आलेले आमदार विविध पक्षांचे प्रतिनिधित्व करत असले, तरी सत्ताधारी आघाडीतील आमदारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासकामांसाठी निधी आणि प्रशासकीय निर्णयांमध्ये जळगावची ताकद वाढल्याचे राजकीय निरीक्षक मानतात.
अनुभव, युवा नेतृत्व आणि सत्तेची समीकरणे एका बाजूला गिरीश महाजन, गुलाबराव पाटील आणि एकनाथ खडसे यांच्यासारखे अनुभवी नेते आहेत, तर दुसरीकडे रक्षा खडसे, मंगेश चव्हाण, अमोल पाटील आणि अमोल जावळे यांसारखे युवा चेहरे पुढील नेतृत्वासाठी स्वतःची जागा निर्माण करत आहेत.
अलीकडेच मंत्री गिरीश महाजन यांनी "माझ्या सात टर्म झाल्या... पुढच्या पिढीला संधी दिली पाहिजे," असे विधान करून नेतृत्वाच्या पिढीबदलाचा मुद्दा चर्चेत आणला होता.

0 टिप्पण्या