जळगाव | जळगाव न्यूज : जळगाव जिल्ह्यातील पाळधी-तरसोद बायपास मार्गावर मुसळधार पावसामुळे रस्त्याचा काही भाग खचल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या घटनेची तातडीने दखल घेत राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत प्रशासनाने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे.
पाहणीनंतर गिरीश महाजन यांनी सांगितले की, प्राथमिक निरीक्षणात रस्त्याच्या बांधकामाच्या गुणवत्तेबाबत शंका निर्माण झाली आहे. यापूर्वीही या प्रकल्पासंदर्भात विविध तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत.
यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही घटनास्थळी पाहणी करून प्रशासनाला नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबविण्याच्या सूचना दिल्या. त्यांनी सांगितले की, पावसामुळे रस्ता खचल्याने कोणतीही दुर्घटना होऊ नये, यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे.
या पाहणीदरम्यान कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार सुरेश (राजूमामा) भोळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, महापौर दीपमाला काळे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
वाहतूक बंद; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
रस्त्याचा काही भाग खचल्यामुळे प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव बायपास मार्गावरील वाहतूक बंद केली आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, या घटनेमुळे बायपासच्या बांधकामाच्या गुणवत्तेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून चौकशी अहवालानंतर पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
थेट तुमच्या व्हॉट्सअपवर मिळवा अपडेट...
https://whatsapp.com/channel/0029Vb68EiMJJhzR7qNXEn0F
लिंकवर क्लिक करून फॉलो करा...

0 टिप्पण्या