Ticker

6/recent/ticker-posts

Translate

Ad Code

Abvp "एका व्यक्तीच्या राजीनाम्याने सिस्टीम बदलत नाही; धोरणात्मक बदलांची गरज" – अभाविपची भूमिका


Jalgaon News :- केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर देशभरात सुरू असलेल्या चर्चेदरम्यान अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप)ने स्पष्ट भूमिका मांडली आहे. "फक्त एका व्यक्तीच्या राजीनाम्याने व्यवस्था बदलणार नाही. परीक्षा प्रणालीत धोरणात्मक आणि संस्थात्मक बदल होणे आवश्यक आहे," असे अभाविपच्या प्रतिनिधींनी सांगितले.

अभाविपने नेहमीच "ठीक करेंगे तीन काम – प्रवेश, परीक्षा आणि परिणाम" ही भूमिका मांडली असल्याचे सांगत, राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA)सह संपूर्ण परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता वाढवण्याची गरज व्यक्त केली.

पारदर्शकतेवर भर

अभाविपच्या मते, पेपर लीकसारख्या घटना टाळण्यासाठी प्रिंटिंग प्रेस, वाहतूक व्यवस्था (Transport), स्ट्राँग रूम यांसारख्या संवेदनशील टप्प्यांवरील मानवी हस्तक्षेप (Human Contact) कमीत कमी करण्यासाठी धोरणात्मक बदल आवश्यक आहेत. त्यामुळे परीक्षा प्रक्रियेवरील विद्यार्थी आणि पालकांचा विश्वास अधिक दृढ होईल.

आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांबाबत सहानुभूती

पेपर लीक प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना सरकारने नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घेतल्यास त्याला कोणताही विरोध नसल्याचे अभाविपने स्पष्ट केले. अशा घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचेही त्यांनी नमूद केले.

आंदोलनातील देशविरोधी घोषणांवर टीका

पेपर लीक आंदोलनादरम्यान काही ठिकाणी देशविरोधी घोषणा, भारतीय सैन्याविषयी अपशब्द आणि वादग्रस्त पोस्टर्स झळकल्याचा आरोप करत अभाविपने अशा घटकांवर कठोर कारवाईची मागणी केली. आंदोलनाच्या नावाखाली देशविघातक कृत्य करणाऱ्यांना जबाबदार धरले जावे, अशी भूमिका संघटनेने घेतली.

"खरा युवा सेवाकार्यात"

अभाविपने सांगितले की, आजचा भारतीय युवा हा पूरग्रस्त भागात मदतकार्य, आषाढी वारीतील सेवा आणि विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होत आहे. त्यामुळे आंदोलनाच्या नावाखाली हिंसाचार किंवा देशविरोधी भूमिका घेणाऱ्यांचे समर्थन करता येणार नाही.

राज्य सरकारांनाही प्रश्न

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर पंजाब आणि कर्नाटकातील पेपर लीक प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर संबंधित राज्यांच्या शिक्षण मंत्र्यांवरही समान निकष लावले जाणार का, असा प्रश्नही अभाविपने उपस्थित केला.

अभाविपच्या मते, धर्मेंद्र प्रधान यांनी विद्यार्थ्यांप्रती संवेदनशीलता आणि आंदोलनाला वेगळे वळण लागू नये या भूमिकेतून राजीनामा दिला असून, या निर्णयाकडे केवळ राजकीय दृष्टीकोनातून पाहू नये.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

0