जळगाव | प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्यातील विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत विक्रमी मतदानाची नोंद झाली असतानाच चाळीसगावातून मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या चाळीसगावात शहर विकास आघाडीच्या १३ नगरसेवकांनी मतदानावर बहिष्कार टाकत निवडणूक प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेत अपक्ष उमेदवारांवर राजकीय दबाव टाकून त्यांना माघार घेण्यास भाग पाडल्याचा आरोप केला. त्यामुळे मतदारांसमोर असलेला पर्याय हिरावून घेण्यात आला असून, "ही लोकशाहीची हत्या आहे," अशी तीव्र प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
बहिष्काराचा निर्णय घेणाऱ्या नगरसेवकांमध्ये अभिषेक देशमुख, सायली जाधव, घृष्णेश्वर पाटील, राजेंद्र चौधरी, दीपक पाटील, इमरान शेख, विजया पवार, राजश्री राजपूत, स्वाती राखुंडे, सविता ठाकूर, वैशाली मोरे, राहुल मस्के आणि पुनम अहिरे यांचा समावेश आहे.
नगरसेवकांनी आरोप केला की, निवडणुकीतील कोणत्याही उमेदवाराने त्यांच्याशी संवाद साधला नाही किंवा विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला नाही. "मतदानापूर्वीच पर्याय संपवला जात असेल, तर निवडून आलेल्या प्रतिनिधीकडून विकासाची अपेक्षा कशी करायची?" असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, जिल्ह्यातील सात मतदान केंद्रांवर मतदान शांततेत पार पडले. अमळनेर, फैजपूर, जळगाव, एरंडोल आणि पाचोरा येथे १०० टक्के मतदान झाले, तर भुसावळमध्ये ९८.३१ टक्के मतदानाची नोंद झाली. मात्र, बहिष्काराच्या पार्श्वभूमीवर चाळीसगावमध्ये केवळ ७०.७३ टक्के मतदान झाले, जे जिल्ह्यातील सर्वात कमी ठरले.
निवडणुकीदरम्यान महाविकास आघाडीचे उमेदवार शरद तायडे यांनी मतदानात कथित 'जादुई पेन' वापरल्याचा आरोप केला. त्यांच्या मते अशा पेनने केलेली नोंद काही वेळानंतर अदृश्य होऊ शकते. मात्र, निवडणूक प्रशासनाने या आरोपांमध्ये कोणताही तथ्याधार नसल्याचे स्पष्ट करत तक्रार फेटाळून लावली.
विक्रमी मतदान, चाळीसगावातील १३ नगरसेवकांचा बहिष्कार आणि मतदान प्रक्रियेवर झालेले आरोप यामुळे यंदाची विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक विशेष चर्चेचा विषय ठरली आहे. आता मतमोजणीनंतर कोण बाजी मारणार आणि या निकालाचे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर काय परिणाम होणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

0 टिप्पण्या