Ticker

6/recent/ticker-posts

Translate

Ad Code

Jamner भाजप नेते तथा शेंदुर्णीचे संस्थाचालक संजय गरुड एसआयटीच्या ताब्यात; शालार्थ आयडी घोटाळ्यात मोठी कारवाई



जळगाव | प्रतिनिधी बहुचर्चित बनावट शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात विशेष तपास पथकाने (SIT) मोठी कारवाई करत जळगाव जिल्ह्यातील शेंदुर्णी येथील शिक्षणसंस्था चालक आणि भाजपचे नेते संजय गरुड यांना सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथून ताब्यात घेतले आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून ते तपास यंत्रणांना चकवा देत होते. या प्रकरणात यापूर्वी निवृत्त शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर यांनाही अटक करण्यात आली होती.

तपास पथकाच्या माहितीनुसार, संजय गरुड हे सतत ठिकाण बदलत असल्याने त्यांचा शोध घेण्यासाठी एसआयटीने दोन दिवस सोलापूर परिसरात विशेष मोहीम राबविली. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे नातेपुते येथील एका फ्लॅटवर छापा टाकून त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर पुढील चौकशीसाठी त्यांना नाशिकला नेण्यात आले असून न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी केली जाण्याची शक्यता आहे.

१७७ शालार्थ आयडी संशयाच्या भोवऱ्यात

तपासादरम्यान संजय गरुड यांच्या शिक्षण संस्थेतील १७७ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडी अवघ्या एका दिवसात तयार करण्यात आल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती समोर आली आहे. या संशयित आयडींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा तपास सुरू असून, नेमका किती निधी वळविण्यात आला याचा शोध एसआयटी घेत आहे.

अनेक शैक्षणिक संस्था

संजय गरुड यांच्या शेंदुर्णी एज्युकेशन संस्थेअंतर्गत जामनेर, पाचोरा, भडगाव आणि चोपडा या चार तालुक्यात १५ माध्यमिक शाळा कार्यरत आहेत. याशिवाय शेंदुर्णी येथे दोन कनिष्ठ महाविद्यालये, वाकोद येथे एक कनिष्ठ महाविद्यालय आणि शेंदुर्णी येथे एक वरिष्ठ महाविद्यालयही आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश

लोकसभा निवडणुकीपूर्वी संजय गरुड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडून देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर ते जळगाव जिल्ह्यातील भाजपच्या शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील प्रमुख नेत्यांपैकी एक मानले जात होते.

शालार्थ ऑनलाइन वेतन प्रणालीतील कथित गैरव्यवहारामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आर्थिक व्यवहार, बनावट कागदपत्रे आणि शासकीय निधीच्या वापराबाबत एसआयटीकडून सखोल तपास सुरू असून, आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

0