जळगाव | प्रतिनिधी जळगावातील कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आक्रमक भूमिका घेत सर्व संशयित शिक्षण संस्थांची विशेष तपास पथक (SIT) मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच ८ ते १५ दिवसांत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही पक्षाने दिला.
तालुकाप्रमुख प्रमोद गंगाधर घुगे यांनी पत्रकारांशी बोलताना, "संजय गरुड तर फक्त झाकी आहे, अजून मोठे मासे बाकी आहेत," असा आरोप करत जळगावातील अनेक शिक्षण संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा दावा केला.
त्यांच्या म्हणण्यानुसार, काही खासगी शिक्षण संस्थांमध्ये शालार्थ आयडीसाठी लाखो रुपयांचे व्यवहार होत असल्याचा आरोप असून, या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष SIT चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
शिवसेनेच्या शिष्टमंडळाने अप्पर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन पाठवले असून, सर्व संशयित शिक्षण संस्थांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
"८ ते १५ दिवसांत कारवाई न झाल्यास आंदोलन"
प्रमोद घुगे यांनी सांगितले की, शासनाने ८ ते १५ दिवसांत ठोस कारवाई केली नाही तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने मोठे आंदोलन उभारण्यात येईल.
भाजपवर गंभीर आरोप
पत्रकार परिषदेत बोलताना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपवरही गंभीर आरोप केले. शालार्थ घोटाळ्यात अटक झालेल्या भाजप नेते संजय गरुड यांचा उल्लेख करत, त्यांच्या माध्यमातून सुरू झालेल्या चौकशीचा विस्तार जळगावातील इतर संशयित संस्थांपर्यंत व्हावा, अशी मागणी करण्यात आली.
पक्षाने असा आरोपही केला की, जळगाव जिल्ह्यातील अनेक संस्था चालकांकडून कथित बोगस शालार्थ आयडी तयार करून शासनाची फसवणूक करण्यात आली असून, या प्रकरणातील सर्व संबंधितांची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे.
उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब सोनवणे यांची मागणी
शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रा. भाऊसाहेब सोनवणे यांनी शासनाकडे पुढील मागण्या केल्या आहेत.
जळगाव जिल्ह्यातील सर्व संशयित शिक्षण संस्थांची SIT मार्फत चौकशी करावी.
दोषींवर कायदेशीर कारवाई करून कठोर शिक्षा द्यावी.
कथित बोगस शालार्थ आयडीद्वारे झालेल्या शासकीय आर्थिक नुकसानीची वसुली करावी.
संपूर्ण तपास पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने करण्यात यावा.
टीप : वरील सर्व आरोप हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केलेले दावे आहेत. संबंधित प्रकरणाचा तपास सुरू असून, अंतिम निष्कर्ष सक्षम तपास यंत्रणा व न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होईल.

0 टिप्पण्या