अमळनेर | प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथे स्वतःच्या शेतात फवारणीसाठी पाणी भरत असताना पाय घसरून विहिरीत पडल्याने दीपक दत्तूसिंग राजपूत (वय ३१) या तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास गावाबाहेरील गणपती मंदिर परिसरातील विहिरीवर घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, दीपक राजपूत हे बैलगाडीसह शेतात फवारणीसाठी जात होते. वाटेत गणपती मंदिराजवळील विहिरीवर ते फवारणी पंपात पाणी भरण्यासाठी थांबले. चार-पाच बादल्या पाणी काढल्यानंतर शेवटची बादली काढत असताना अचानक त्यांचा तोल गेला आणि ते थेट विहिरीत कोसळले.
घटनेची माहिती मंदिराशेजारी असलेल्या किशोर हरी मालचे यांना समजताच त्यांनी तातडीने गावातील नातेवाईकांना कळविले. ग्रामस्थांच्या मदतीने दीपक यांना विहिरीतून बाहेर काढून त्वरित अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील आणि सरपंच यांनी घटनास्थळी पंचनामा करून मारवड पोलीस ठाण्यात खबर दिली. शवविच्छेदनानंतर सायंकाळी दीपक यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
दीपक यांच्या पश्चात आई, एक भाऊ आणि दोन बहिणी असा परिवार असून, घरातील कर्ता मुलगा अकाली गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या प्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक साजिद मन्सूरी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संजय पाटील पुढील तपास करीत आहेत.

0 टिप्पण्या