Ticker

6/recent/ticker-posts

Translate

Ad Code

Jalgaon मुक्ताईनगरात प्रतिबंधित गुटख्याचा सुळसुळाट? प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर नागरिकांचे प्रश्नचिन्ह




मुक्ताईनगर | प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर शहरात प्रतिबंधित गुटख्याची अवैध खरेदी-विक्री आणि वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, तालुक्यासह शहरातील अनेक पानटपऱ्या व किरकोळ दुकानांमध्ये प्रतिबंधित गुटखा सहज विक्रीसाठी उपलब्ध होत असल्याचे दिसून येत आहे. मुक्ताईनगरला लागून असलेल्या मध्यप्रदेशातील बुऱ्हाणपूर परिसरातून मोठ्या प्रमाणात गुटख्याची आवक होत असल्याची चर्चा असून, काळ्या काचा असलेल्या वाहनांद्वारे त्याची वाहतूक केली जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, अशा काही बाहेरगावच्या वाहनांवर वेळोवेळी कारवाई होत असल्याचे समोर येत असले, तरी शहरातील स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या अवैध विक्रीवर सातत्यपूर्ण आणि प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

पूर्णाड फाटा परिसरात पोलीस गस्त सुरू असल्याचा दावा केला जात असतानाही शहरात प्रतिबंधित गुटख्याची आवक-जावक सुरूच असल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत. एवढ्या कडक गस्तीच्या पार्श्वभूमीवर गुटखा शहरात नेमका कसा पोहोचतो, याचा शोध घेण्याची मागणी होत आहे.

काही स्थानिक सूत्रांच्या हवाल्याने या अवैध साखळीत काही राजकीय कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याचे आरोप करण्यात येत आहेत. तसेच काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या संदर्भात पुरावे असल्याचा दावा करत पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मात्र, या आरोपांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.

यामुळे या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे. तसेच शहरातील प्रतिबंधित गुटख्याच्या अवैध व्यापारावर व्यापक मोहीम राबवून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक (SP), उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) तसेच पोलीस निरीक्षक (PI) यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालून शहरातील अवैध गुटखा खरेदी-विक्रीचे जाळे उद्ध्वस्त करावे आणि कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.




नागरिकांचे सवाल
बाहेरगावच्या वाहनांवर कारवाई करूनच प्रशासन आपली जबाबदारी पूर्ण झाल्याचे दाखवत आहे का?
शहरातील अवैध गुटखा वाहतुकीवर प्रभावी आणि सातत्यपूर्ण कारवाई कधी होणार?
प्रतिबंधित गुटख्याच्या विक्रीत सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई नेमकी कधी होणार?

या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांनी सर्व आरोपांची निष्पक्ष चौकशी करून सत्य समोर आणावे आणि दोषींवर कायदेशीर कारवाई करून शहरातील प्रतिबंधित गुटख्याच्या अवैध व्यापाराला आळा घालावा, अशी मागणी मुक्ताईनगरकरांकडून केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

0