Ticker

6/recent/ticker-posts

Translate

Ad Code

Amalner लाखावर भाविकांनी घेतले अंबरीष ऋषी व विष्णुदेवाचे दर्शन; अमळनेरची द्वादश यात्रा भक्तिभावात संपन्न



अमळनेर | प्रतिनिधी प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमळनेर नगरीतील पवित्र श्री अंबरीषजी ऋषी महाराज टेकडी येथे आषाढ शुद्ध द्वादशी निमित्त भरलेल्या पारंपरिक द्वादश यात्रेला यंदा सुमारे एक लाखांहून अधिक भाविकांनी उपस्थिती लावत श्री अंबरीष ऋषी महाराज आणि श्री विष्णुदेवाचे दर्शन घेतले.

पहाटेपासूनच टेकडीवर दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. रिमझिम पावसात नटलेला हिरवागार परिसर, भक्तिमय वातावरण, वनभोजनाची परंपरा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश यामुळे यात्रेला विशेष आकर्षण लाभले.

श्री अंबरीषजी ऋषी महाराज मंदिर संस्थान आणि टेकडी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या यात्रेत अमळनेर शहरासह तालुका आणि परिसरातील अनेक गावांमधून भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

धार्मिक परंपरेला उजाळा

धार्मिक परंपरेनुसार श्री अंबरीषजी ऋषी महाराज हे राजघराण्यातील सोळावे गादीपुरुष मानले जातात. हिमालयात कठोर तपश्चर्या केल्यानंतर त्यांनी अमळनेर येथील टेकडीवर श्रीहरी विष्णू आणि भगवान शंकर यांची आराधना केली. त्यांच्या तपश्चर्येमुळे ही भूमी पावन झाल्याची श्रद्धा असून, दरवर्षी आषाढ शुद्ध द्वादशीला येथे मोठ्या उत्साहात यात्रा भरते.

वनभोजनाची परंपरा कायम

दर्शनानंतर अनेक भाविकांनी कुटुंबीय व मित्रपरिवारासह टेकडी परिसरात वनभोजनाचा आनंद घेतला. घरून आणलेल्या दशमी, पराठे, भाकरी, ठेचा तसेच विविध घरगुती पदार्थांचा आस्वाद घेत भाविकांनी निसर्गाच्या सान्निध्यात दिवस घालवला.

यात्रेच्या परिसरात भजी, वडापाव, जिलेबी, गोडशेव, पत्रा भजी आणि बटाटा भजीसह विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्सही आकर्षणाचे केंद्र ठरले.

लांब फुग्यांच्या काकड्यांचा पारंपरिक खेळ

यात्रेतील प्रमुख आकर्षणांपैकी एक म्हणजे पारंपरिक लांब फुग्यांच्या काकड्यांचा खेळ. टेकडीवरील उंच ठिकाणी वाऱ्याच्या झोतामुळे निर्माण होणारा आवाज अनुभवण्यासाठी लहान मुलांपासून तरुणांपर्यंत सर्वांनी मोठी गर्दी केली.

२२ फूट उंच हनुमान मूर्ती भाविकांचे आकर्षण

यात्रेतील आणखी एक प्रमुख आकर्षण म्हणजे विजय बाविस्कर परिवाराने उभारलेली २२ फूट उंच भव्य हनुमान मूर्ती. भाविकांनी हनुमानाचे दर्शन घेत श्रद्धा व्यक्त केली. भव्य मूर्तीसोबत छायाचित्रे काढण्यासाठी तसेच सोशल मीडियासाठी रील्स तयार करण्यासाठी युवक-युवतींची मोठी गर्दी पाहायला मिळाली.

पर्यावरण संवर्धनाचा आदर्श संदेश

दरवर्षीप्रमाणे यंदाही टेकडी ग्रुपने स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत भाविकांना कचरा कचराकुंडीतच टाकण्याचे आवाहन केले. यात्रेनंतर सदस्यांनी श्रमदानातून संपूर्ण परिसराची स्वच्छता करून कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली.

गेल्या अनेक वर्षांपासून टेकडी ग्रुपच्या माध्यमातून टेकडी परिसरात वृक्षलागवड, वृक्षसंवर्धन आणि जलसंधारणाचे विविध उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. आतापर्यंत पाच हजारांहून अधिक वृक्षांची लागवड करून त्यांचे संवर्धन करण्यात आले आहे.

मंदिर संस्थान आणि टेकडी ग्रुपच्या वतीने भाविकांना वाहने पायथ्याशी उभी करण्याचे, वृक्षांचे नुकसान टाळण्याचे आणि पावसाळ्यात साचलेल्या पाण्याच्या ठिकाणी जाणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले होते.

भक्ती, निसर्ग, सामाजिक जबाबदारी आणि पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संगम घडवून आणणारी श्री अंबरीषजी ऋषी महाराज टेकडीची द्वादश यात्रा यंदाही लाखो भाविकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे संस्मरणीय ठरली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

0