जळगाव | प्रतिनिधी आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांसाठी एसटी महामंडळाने सुरू केलेल्या विशेष बससेवेला जळगाव जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातून २४ विशेष बसद्वारे तब्बल १०५६ भाविकांनी पंढरपूर यात्रेचा लाभ घेतला असल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली आहे.
दरवर्षी लाखो वारकरी पायी दिंडी व पालख्यांसह पंढरपूरकडे प्रस्थान करतात. मात्र वयोवृद्ध, महिला, लहान मुले तसेच पायी वारी करणे शक्य नसलेल्या भाविकांसाठी एसटी महामंडळाने ‘तीर्थाटन विशेष बस सेवा’ सुरू केली आहे. त्यामुळे सुरक्षित आणि सवलतीच्या दरात विठुरायाच्या दर्शनासाठी जाण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.
एसटीच्या नियमानुसार एका गावातून पंढरपूरला जाणारे ४४ प्रवासी उपलब्ध झाल्यास त्या गावातून थेट विशेष बस सोडण्यात येत आहे. विशेष म्हणजे या बससेवेत प्रवाशांना शासनाच्या विविध योजनांअंतर्गत मिळणाऱ्या सर्व प्रवासी सवलतींचा लाभ दिला जात आहे.
महिलांना तिकिट दरात ५० टक्के सवलत, तर अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत ७५ वर्षांवरील नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा देण्यात येत आहे. याशिवाय इतर पात्र प्रवाशांनाही विविध सवलतींचा लाभ मिळत असल्याने या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
एसटी प्रशासनाने पंढरपूर यात्रेसाठी विशेष बस नोंदणी सुरू ठेवली असून, भाविकांच्या मागणीनुसार थेट गावातून बस सोडल्या जाणार आहेत. अनेक बस पंढरपूरला पोहोचल्या असून आता परतीच्या प्रवासालाही सुरुवात झाली आहे.
जळगाव विभागातील भाविकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे. सवलतीच्या दरात आणि सुरक्षित प्रवासाच्या सुविधेमुळे भाविकांकडून या उपक्रमाचे स्वागत केले जात आहे.

0 टिप्पण्या