Translate

Ad Code

विहीर अनुदानात भ्रष्टाचाराचा घोटाळा? ३० हजारांच्या लाचेची मागणी; जामनेर पंचायत समितीचा तांत्रिक सहाय्यक एसीबीच्या रडारवर



जळगाव (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्याऐवजी त्यांच्याकडून लाचेची मागणी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार जामनेर तालुक्यात उघडकीस आला आहे. विहीर अनुदान मंजूर करून देण्यासाठी तब्बल ३० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी जामनेर पंचायत समितीतील कंत्राटी तांत्रिक सहाय्यक सागर अशोक नावकर (वय ३२) याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पडताळणीत लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार शेतकऱ्याला शासनाच्या विहीर अनुदान योजनेअंतर्गत लाभ मंजूर झाला होता. विहिरीच्या जागेची पाहणी करून तांत्रिक अहवाल तयार करणे व अनुदानाची प्रक्रिया पूर्ण करणे ही जबाबदारी संबंधित तांत्रिक सहाय्यकाकडे होती. मात्र, प्रत्यक्ष पाहणीपूर्वीच ग्रामरोजगार सेवकाच्या माध्यमातून ३० हजार रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.

यानंतर विहिरीची पाहणी करून आवश्यक कागदपत्रे पूर्ण करण्यात आली आणि तक्रारदाराला टप्प्याटप्प्याने ६० हजार ९६६ रुपयांचे अनुदान प्राप्त झाले. मात्र उर्वरित अनुदान मिळवून देण्यासाठी पुन्हा एकदा ३० हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, विहिरीची जागा बदलल्याचे कारण पुढे करत ही मागणी करण्यात आली. "पैसे दिल्याशिवाय उर्वरित अनुदान मंजूर होणार नाही," असा दबाव टाकण्यात आल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.

सततच्या मागणीला कंटाळून संबंधित शेतकऱ्याने जळगाव एसीबीकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर विभागाने नियमानुसार पडताळणी केली. पंचांसमक्ष झालेल्या पडताळणीत तांत्रिक सहाय्यकाने ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. या अहवालाच्या आधारे जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणामुळे पंचायत समितीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून शासनाच्या योजनांमध्ये दलालशाही आणि भ्रष्टाचाराचे जाळे किती खोलवर रुजले आहे, याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. ग्रामीण भागातील शेतकरी आधीच आर्थिक संकटाशी झुंज देत असताना अनुदानासाठी लाच मागितली जाणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.

दरम्यान, या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का, याचा शोध एसीबीकडून घेतला जात असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या