रावेर | जळगाव न्यूज प्रतिनिधी वाघोड (ता. रावेर) येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेच्या दुरवस्थेबाबत बातमी प्रसिद्ध होऊन तब्बल २५ दिवस उलटले, मात्र अद्यापही संबंधित प्रशासन आणि ठेकेदाराने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. त्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून शाळेच्या दोन वर्गखोल्यांचे छत पूर्णपणे उघडे असून मुसळधार पावसामुळे भिंती, लाकडी सांगाडा आणि संपूर्ण इमारत पाण्यात भिजत आहे. ही शाळा शंभर वर्षांहून अधिक जुनी असल्याने भिंती कोसळण्याचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागत असून त्यांच्या जीविताची जबाबदारी नेमकी कोणाची, असा प्रश्न पालकांकडून उपस्थित केला जात आहे.
यापूर्वी एका वृत्तपत्राने ही बाब उघडकीस आणली होती. त्यानंतरही परिस्थितीत कोणताही बदल झाला नाही. आता जळगाव न्यूज पुन्हा एकदा हा गंभीर प्रश्न प्रशासनासमोर मांडत आहे.
काम मंजूर... पण अर्धवटच!
ग्रामपंचायतीच्या १५ व्या वित्त आयोगातून दोन वर्गखोल्यांवर लोखंडी पत्रे बसविण्याचे काम मंजूर झाले होते. एप्रिल महिन्यात ठेकेदाराने जुने कौल काढून टाकले, मात्र त्यानंतर काम पूर्ण करण्यात आले नाही. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपणे, प्रशासक बदलणे आणि बिल मंजुरीचा प्रश्न यामुळे काम रखडल्याचे सांगितले जात आहे.
मात्र प्रश्न असा आहे की, प्रशासकीय प्रक्रियेच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करण्याचा अधिकार कोणाला दिला आहे?
अधिकारी झोपले आहेत का?
- जिल्हाधिकारी याकडे लक्ष देणार का?
- जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना या गंभीर परिस्थितीची माहिती आहे का?
- रावेर पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी आणि जिल्हा शिक्षण अधिकारी यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रभावी कारवाई का झाली नाही?
- स्थानिक लोकप्रतिनिधी केवळ घोषणा आणि फित कापण्यात व्यस्त आहेत का?
हे प्रश्न आता नागरिक आणि पालक विचारू लागले आहेत.
थेट तुमच्या व्हॉट्सअपवर मिळवा अपडेट...
https://whatsapp.com/channel/0029Vb68EiMJJhzR7qNXEn0F
लिंकवर क्लिक करून फॉलो करा...
विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात
सततच्या पावसामुळे वर्गांमध्ये पाणी साचत आहे. भिंती ओलाव्याने कमकुवत झाल्या आहेत. लाकडी छत पूर्णपणे भिजले आहे. कोणत्याही क्षणी दुर्घटना घडू शकते. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना शाळेत बसवणे धोकादायक असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष चौधरी यांनी आठवडाभरात काम पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. तर गटविकास अधिकारी विनोद मेढे यांनीही संबंधित ठेकेदाराला काम तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.
जळगाव न्यूजचा सवाल
बातमी प्रसिद्ध होऊन २५ दिवस झाले... अजून किती दिवस प्रशासन जागे होणार?
विद्यार्थ्यांच्या जीवाशी संबंधित हा प्रश्न आहे. एखादी दुर्घटना घडल्यानंतरच अधिकारी आणि लोकप्रतिनिधी जागे होणार का?
जळगाव न्यूजची मागणी :
वाघोड जिल्हा परिषद शाळेवरील लोखंडी पत्रे तातडीने बसवून वर्गखोल्या सुरक्षित कराव्यात, तसेच या कामात झालेल्या विलंबाची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड होऊ नये, हीच सर्वांची अपेक्षा आहे.

0 टिप्पण्या