जळगाव | प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात भाजपच्या अंतर्गत राजकारणाची पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली आहे. भाजपचे पदाधिकारी डॉ. कुंदन सुधाकर फेगडे यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका सूचक पोस्टमुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
डॉ. फेगडे यांनी फेसबुक पोस्टमध्ये पक्षातील काही कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे अनेक सवाल उपस्थित केले आहेत. त्यांनी थेट कोणाचेही नाव न घेता विचारले आहे की, "चांगले दिवस असताना पदे मिळवणारे आणि जयजयकार करणारे, पक्ष अडचणीत असताना घरात बसून संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांना रोखत आहेत का?"
पोस्टमध्ये त्यांनी पुढे असेही म्हटले आहे की, "यांच्यातील लढाऊ प्रवृत्ती संपली आहे का? कॉपी-पेस्टची मंडळी ही ठेके घेतल्यासारखी वागत आहेत का? वर्षानुवर्षे सोसलेल्या निष्ठावंतांवर अन्याय होत आहे का? पक्ष, युवा आणि मोर्चे कुठे गेले?"
शेवटी त्यांनी "उठा जागे व्हा आणि जोपर्यंत ध्येय गाठत नाही तोपर्यंत चालत राहा" असा संदेश देत पक्षातील कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे.
डॉ. फेगडे यांच्या या पोस्टमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे, आमदार अमोल जावळे यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांना टॅग करण्यात आले आहे. त्यामुळे या पोस्टचे राजकीय महत्त्व अधिक वाढले असून, जळगाव जिल्ह्यात भाजपमध्ये अंतर्गत नाराजी आहे का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
मात्र, या पोस्टमध्ये कोणत्याही व्यक्तीचे नाव घेण्यात आलेले नाही. त्यामुळे नेमका रोख कोणाकडे आहे, याबाबत अधिकृत स्पष्टता समोर आलेली नाही. संबंधित नेत्यांकडूनही यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
थेट तुमच्या व्हॉट्सअपवर मिळवा अपडेट...
https://whatsapp.com/channel/0029Vb68EiMJJhzR7qNXEn0F
लिंकवर क्लिक करून फॉलो करा...
डॉ. फेगडे यांच्या या फेसबुक पोस्टमुळे जळगावच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फुटले असून, येत्या काळात यावर भाजपकडून कोणती भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

0 टिप्पण्या