Translate

Ad Code

SOCIAL JUSTICE CONFERENCE 2026 महाड येथे २८ जून रोजी राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषदेचे आयोजन

जळगाव (मनु निळे) : राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती व ‘सामाजिक न्याय’ दिनाच्या निमित्ताने २८ जून २०२६ रोजी महाड येथे राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. विवेक विचार मंच, बार्टी, आर्टी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे आणि सहयोगी संघटना महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद होणार आहे.


विवेक विचार मंच महाराष्ट्रात भारतीय संविधानाला अपेक्षित सामाजिक न्यायाच्या तत्त्वांवर कार्यरत असून वंचित घटकांच्या न्याय हक्कांसाठी सातत्याने काम करत आहे. संविधानिक मूल्यांची रुजवणूक, सामाजिक बंधुभावाची जपणूक आणि सामाजिक समतेचा प्रसार हा मंचाचा प्रमुख उद्देश आहे. राज्यातील जातीय अन्याय, अत्याचार आणि सामाजिक तणावाच्या घटनांमध्ये सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून मंच सक्रियपणे कार्यरत आहे.

राज्यातील वंचित घटकांसाठी काम करणाऱ्या संस्था, संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांना एकत्र आणून संवाद व समन्वय वाढविणे, तसेच सामाजिक न्यायाच्या चळवळीला अधिक गती देणे या उद्देशाने या परिषदेचे आयोजन दरवर्षी केले जाते. याचबरोबर सामाजिक न्याय आणि समतेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था व कार्यकर्त्यांचा गौरव करण्यासाठी ‘छत्रपती राजर्षी शाहू महाराज सामाजिक न्याय पुरस्कार’ प्रदान करण्यात येतात.

यंदाचे वर्ष संत रविदास महाराज यांचे ६५० वे जयंती वर्ष, महात्मा ज्योतिराव फुले यांचे २०० वे जयंती वर्ष, संत गाडगे महाराज यांचे १५० वे जयंती वर्ष तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त विशेष महत्त्वाचे ठरत आहे. महाराष्ट्र शासनाने सन २०२६-२७ हे वर्ष ‘सामाजिक समता समरसता वर्ष’ म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतल्याने या परिषदेचे महत्त्व अधिक वाढले आहे.

परिषदेस केंद्रीय मंत्री किरण रिजिजू, पद्मश्री दादा इदाते, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, बार्टीच्या प्रभारी महासंचालक दीपा मुधोळ मुंडे, आर्टीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनिश कामत यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

‘छत्रपती राजर्षी शाहू महाराज सामाजिक न्याय पुरस्कार २०२६’ जाहीर

पश्चिम महाराष्ट्र विभाग

  • ॲड. विजय लक्ष्मण गव्हाळे (बारामती)
  • मिलिंद मधुकर जाधव (पिंपरी-चिंचवड)

मराठवाडा-खान्देश विभाग

  • नागेश मोहन कंडारे (धुळे)
  • प्रा. डॉ. राजेश नारायणराव रगडे (छत्रपती संभाजीनगर)
  • नागसेन शामराव पुंडगे (परभणी)
  • डॉ. अनुप्रिता जाईबाई मोरे (बीड)

विदर्भ विभाग

  • प्रभाकर मनोहर शिंदे (नागपूर)
  • शाम वसंत माळवंदे (खामगाव, बुलढाणा)

कोकण विभाग

  • स्मिता सुशांत कवडे (मुंबई)
  • विजय अंबुजी जाधव, अध्यक्ष कर्मवीर दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्र (अंधेरी, मुंबई)
  • महादेव कृष्णाजी गोठणकर (राजापूर, रत्नागिरी)

राज्यभरातील सुमारे १० हजारांहून अधिक सामाजिक संस्था, संघटनांचे प्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्ते परिषदेत सहभागी होणार आहेत. परिषदेत उद्घाटन सत्र, संवाद सत्र आणि समारोप सत्र अशी तीन प्रमुख सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. उद्घाटन सत्रात मान्यवरांची भाषणे व पुरस्कार वितरण होणार असून संवाद सत्रात अनुसूचित जाती प्रवर्गाच्या समस्या, सामाजिक न्याय, समता, शासकीय योजना आणि अन्याय-अत्याचाराच्या घटनांवर चर्चा होणार आहे. समारोप सत्रात विविध सामाजिक विषयांवरील ठराव मंजूर करण्यात येणार आहेत.

परिषदेच्या स्वागत समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ॲड. संजय सहदेव भिसे असून सौ. मिलन बहुलेकर, संदीप शेठ, सिद्धेश जैतपाल, प्रमोद महाडिक आणि गणेश जंगम हे सदस्य आहेत. परिषद यशस्वी करण्यासाठी विष्णू केंजळे, सत्यवान महाडिक, विजय वेदपाठक, प्रबोधन निकाळजे आणि जयवंत तांबे प्रयत्नशील आहेत.

परिषद तपशील

📅 दिनांक : २८ जून २०२६ (रविवार)
🕤 वेळ : सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.००
📍 स्थळ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, महाड, जि. रायगड.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या