Ticker

🔴 BREAKING NEWS
Loading...

Ad Code

आशा स्वयंसेविकांवर निवडणुकीच्या कामाचा बोजा; आरोग्य सेवेवर परिणाम होण्याची भीती, आदेश रद्द करण्याची मागणी


यावल | प्रतिनिधी 
ग्रामीण भागात तळागाळापर्यंत आरोग्य सेवा पोहोचवणाऱ्या आशा स्वयंसेविकांवर निवडणुकीच्या कामाची जबाबदारी सोपविण्यात आल्याने आरोग्य सेवा विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आशा स्वयंसेविकांची निवडणुकीच्या कामावरील नियुक्ती तातडीने रद्द करावी, अशी मागणी होत आहे.

सध्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अतिसार, मलेरिया, डेंग्यूसारख्या साथीच्या आजारांचा धोका वाढला आहे. अशा परिस्थितीत आशा स्वयंसेविका रुग्ण शोधणे, सर्वेक्षण करणे, गर्भवती माता, बालके व इतर लाभार्थ्यांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवणे यासारखी महत्त्वाची कामे करत आहेत. दररोज ६ ते ७ तास सेवा देत असताना त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारीही असते.

जळगाव जिल्ह्यातील माहिती आणि न्यूज थेट आपल्या व्हाट्सअपवर लिंक वर क्लिक करा 

आरोग्य सेवा की निवडणूक?

आरोग्य सेवेसोबतच निवडणुकीची जबाबदारी देण्यात आल्यास दोन्ही कामांवर परिणाम होण्याची शक्यता असून, साथीच्या आजारांच्या नियंत्रणात अडथळे निर्माण होऊ शकतात, अशी चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

'बीएलओ' नियुक्तीवर कायदेशीर प्रश्नचिन्ह

मागणीकर्त्यांचे म्हणणे आहे की, निवडणूक कायद्याच्या कलम १३(ब)(२) नुसार मतदानस्तरीय अधिकारी (BLO) म्हणून शासकीय, निमशासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेतील अधिकृत कर्मचाऱ्यांची नियुक्ती होणे अपेक्षित आहे. आशा स्वयंसेविका या कायमस्वरूपी शासकीय कर्मचारी नसून, विशिष्ट आरोग्य सेवेसाठी कामाच्या मोबदल्यावर कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांची बीएलओ म्हणून नियुक्ती कायदेशीरदृष्ट्या योग्य नसल्याचा दावा करण्यात आला आहे.

आदेश मागे घेण्याची मागणी

आशा स्वयंसेविकांना बीएलओ किंवा इतर कोणत्याही निवडणूक कामातून वगळून त्यांना पूर्णवेळ आरोग्य सेवेसाठी उपलब्ध करून द्यावे. ज्या आशा स्वयंसेविकांना आदेश देण्यात आले आहेत, त्यांचे आदेश तातडीने रद्द करावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.

टीप : ही मागणी संबंधित आशा स्वयंसेविका व त्यांच्या प्रतिनिधींनी केली असून, याबाबत निवडणूक प्रशासन किंवा संबंधित अधिकाऱ्यांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

0