Translate

Ad Code

यावलवर आयुक्तांचा धडक दौरा; सर्व विभागांची झाडाझडती! औषध तुटवड्यावर तातडीचे निर्देश, अधिकाऱ्यांना खडसावले



उपसंपादक : मिलिंद जंजाळे | यावल नाशिक विभागाचे आयुक्त प्रविण गेडाम यांनी शुक्रवारी यावल तालुक्यात विविध शासकीय विभागांची धडक पाहणी करत प्रशासनाची कसून झाडाझडती घेतली. पंचायत समिती सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत शासनाच्या योजनांची अंमलबजावणी, प्रलंबित कामे, नागरिकांच्या तक्रारी आणि विभागनिहाय कामकाजाचा सखोल आढावा घेत अनेक अधिकाऱ्यांना त्रुटींवरून स्पष्ट शब्दांत सुनावण्यात आले.

बैठकीत विशेषतः प्राथमिक आरोग्य केंद्रांतील औषध तुटवड्याच्या तक्रारींवर आयुक्तांनी गंभीर नाराजी व्यक्त केली. या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याचे आदेश देत जिल्ह्यात आवश्यक औषधसाठा उपलब्ध राहील, यासाठी संबंधित यंत्रणेला त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आयुक्त गेडाम यांनी शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचलाच पाहिजे, असे स्पष्ट करत कामातील हलगर्जीपणा, दिरंगाई किंवा निष्काळजीपणा कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, असा इशारा अधिकाऱ्यांना दिला. नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करून प्रशासन अधिक उत्तरदायी आणि संवेदनशील पद्धतीने काम करावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या.



बैठकीदरम्यान विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना कामातील अडचणी मांडण्याची संधी देण्यात आली. त्यावरील उपाययोजनांसाठी आवश्यक ते निर्णय घेण्याचे आश्वासन देत नागरिकांना शासकीय सेवांसाठी वारंवार हेलपाटे मारावे लागू नयेत, यासाठी प्रशासनाने कार्यपद्धतीत सुधारणा करण्यावर भर द्यावा, असे आयुक्तांनी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, अतिरिक्त जिल्हाधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, नायब तहसीलदार गांगुर्डे, गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड, सहाय्यक गटविकास अधिकारी दीपक कदम यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

यावलमधील विविध शासकीय कार्यालयांची प्रत्यक्ष पाहणी आणि अधिकाऱ्यांची झाडाझडती झाल्याने प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली आहे. आता प्रलंबित कामे, आरोग्य सेवा, विकासकामे आणि नागरिकांच्या तक्रारींच्या निवारणाबाबत प्रशासन किती प्रभावीपणे कार्यवाही करते, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.


जळगाव जिल्ह्यातील माहिती आणि न्यूज थेट आपल्या व्हाट्सअपवर लिंक वर क्लिक करा 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या