Translate

Ad Code

संत सखाराम महाराज वाडीच्या पुनर्बांधणीसाठी १५ कोटींची मागणी; आमदार अनिल पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट



अमळनेर | प्रतिनिधी अमळनेर येथील परमपूज्य श्री संत सखाराम महाराज वाडी संस्थानात लागलेल्या भीषण आगीमुळे झालेल्या नुकसानीनंतर मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी १५ कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर करावा, अशी मागणी अमळनेरचे आमदार तथा माजी मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील विधानभवनात प्रत्यक्ष भेट घेऊन केली.

आमदार पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले की, १ जुलै २०२६ रोजी मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत सुमारे २५० वर्षांचा ऐतिहासिक आणि कलात्मक लाकडी गाभारा पूर्णपणे जळून खाक झाला. प्राथमिक अंदाजानुसार या दुर्घटनेत सुमारे १५ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

मात्र, या भीषण आगीत विठ्ठल-रखुमाईच्या मूर्ती आणि मुख्य मंदिर सुरक्षित राहिल्याने भाविकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तरीही गाभाऱ्याचे ऐतिहासिक आणि आध्यात्मिक वैभव नष्ट झाल्याने लाखो वारकरी आणि भाविकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

🚩 'प्रति पंढरपूर'च्या जतनाची मागणी

खान्देशचे 'प्रति पंढरपूर' म्हणून ओळखले जाणारे संत सखाराम महाराज वाडी संस्थान हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. येत्या २५ जुलै रोजी आषाढी एकादशी असल्याने मोठ्या संख्येने वारकरी येथे दर्शनासाठी येतात. त्यामुळे मंदिराचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करून पर्यटन किंवा तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत विशेष निधी मंजूर करावा, अशी मागणी आमदार पाटील यांनी केली.

✅ मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीची गांभीर्याने दखल घेत शासन सकारात्मक भूमिका घेईल आणि आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही दिल्याचे आमदार अनिल पाटील यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या