Translate

Ad Code

जळगाव हादरलं! जामनेरमध्ये ४० वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार; व्हिडिओ व्हायरल, १५ जणांविरुद्ध गुन्हा, १४ आरोपी ताब्यात


जळगाव | प्रतिनिधी 
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. देवळगाव–कापूसवाडी रोडलगतच्या जंगलात ४० वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली असून, या प्रकरणात १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आतापर्यंत १४ आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला तिच्या ओळखीच्या एका तरुणासोबत ठाणावर्डी जंगल परिसरात गेली होती. त्यावेळी आरोपींनी त्यांना अडवले. त्यानंतर दोन आरोपींनी महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. तर इतर दोन आरोपींनी या कृत्याचे मोबाईलवर चित्रीकरण केले. उर्वरित आरोपींनी पीडित महिला आणि तिच्या परिचिताला धमकावून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा गंभीर आरोप आहे.

घटना २ जून २०२६ रोजी घडल्याचे सांगितले जात असून, पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर फत्तेपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा कोणत्या कलमांखाली?

या प्रकरणात भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम ७०(१), ७७, ३५१(२) तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) कलम ६६E व ६७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१४ आरोपी पोलिसांच्या ताब्यात

या प्रकरणातील एकूण १५ आरोपींपैकी १४ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक कासार, जामनेर पोलीस स्टेशन करत आहेत.

पोलिसांचे नागरिकांना आवाहन

जळगाव पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारच्या घटना पूर्वी घडल्या असतील किंवा कोणाकडे संबंधित माहिती असेल, तर त्यांनी निःसंकोचपणे फत्तेपूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. प्रत्येक तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

टीप: लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये पीडितेची ओळख उघड होईल अशी कोणतीही माहिती प्रकाशित करणे कायद्याने प्रतिबंधित आहे. त्यामुळे तिच्या गोपनीयतेचा आदर राखणे ही सर्वांची जबाबदारी आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या