Translate

Ad Code

आमदार मंगेश चव्हाण यांचा उन्मेष पाटील यांच्यावर सोशल मीडियातून हल्लाबोल; गंभीर आरोप



जळगाव | प्रतिनिधी  जळगाव जिल्ह्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले असून, आमदार मंगेश चव्हाण यांनी माजी खासदार उन्मेष पाटील यांच्याविरोधात सोशल मीडियावर सलग पोस्ट करून गंभीर आरोपांची मालिका प्रसिद्ध केली आहे. विविध पोस्टरच्या माध्यमातून त्यांनी कथित चोरी, पोलिसांवर दबाव, गौण खनिज प्रकरण आणि एसटी स्मार्ट कार्ड केंद्राशी संबंधित मुद्दे उपस्थित केले आहेत.

आमदार चव्हाण यांनी केलेल्या पोस्टनुसार, उमंग व्हाईट गोल्ड जिनिंगमधील कथित मशिनरी चोरी प्रकरणातील आरोपी हा उन्मेष पाटील यांचा पाहुणा असल्याचा दावा करण्यात आला आहे. या आरोपीला अटक करणारे पीएसआय संदीप घुले यांच्याविरोधात वैयक्तिक आकसातून आंदोलन करून त्यांची बदनामी करण्यात आल्याचाही आरोप पोस्टमध्ये करण्यात आला आहे. तसेच, आरोपीचा जामीन वारंवार फेटाळला जात असल्याने आंदोलनाच्या माध्यमातून पोलिसांवर अप्रत्यक्ष दबाव आणला जात असल्याचा दावाही करण्यात आला आहे.



याशिवाय, बिलाखेड येथील शेळी-मेंढी प्रक्षेत्रातील कथित मुरूम चोरी प्रकरणात उन्मेष पाटील यांच्या कार्यकर्त्याचा सहभाग असल्याचा आरोपही आमदार चव्हाण यांनी केला आहे. प्रक्षेत्र व्यवस्थापकांना मारहाण, मोबाईल हिसकावून नेणे आणि नंतर खोटी तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा पोस्टमध्ये करण्यात आला आहे. पोलिसांनी चौकशीनंतर संबंधितांवर गुन्हा दाखल केल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

जळगाव जिल्ह्यातील माहिती आणि न्यूज थेट आपल्या व्हाट्सअपवर लिंक वर क्लिक करा

दुसऱ्या एका पोस्टमध्ये चाळीसगाव बसस्थानक परिसरातील कथित एसटी स्मार्ट कार्ड केंद्राचा उल्लेख करत, उन्मेष पाटील यांचे कार्यकर्ते वाल्मिक महाले यांच्या माध्यमातून आर्थिक वसुली होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात काही महिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी चौकशीसाठी बोलावल्याचेही पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, हे सर्व आरोप आमदार मंगेश चव्हाण यांनी सोशल मीडियावर केलेले असून, त्याबाबत स्वतंत्र अधिकृत पुष्टी झालेली नाही. या आरोपांबाबत माजी खासदार उन्मेष पाटील यांची भूमिका जाणून घेण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात येत असून, त्यांची बाजू प्राप्त झाल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येईल.

जिल्ह्यातील दोन प्रमुख नेत्यांमधील या आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, पुढे या प्रकरणाला कोणते वळण लागते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या