जिल्हा नियोजन समितीची बैठक; सलग चौथ्या वर्षी १००% निधी खर्च, २०२६-२७ साठी ९००.०५ कोटींच्या आराखड्यावर चर्चा
जळगाव | प्रतिनिधी जळगाव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी दर्जेदार नियोजन, विकासकामांची वेळेत अंमलबजावणी आणि निधीचा गुणवत्तापूर्ण वापर याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. जळगाव जिल्ह्याने सलग चौथ्या वर्षी जिल्हा वार्षिक योजनेचा १०० टक्के निधी खर्च करून राज्यात आदर्श निर्माण केल्याचेही त्यांनी गौरवाने नमूद केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित बैठकीत पालकमंत्री मुंबई मंत्रालयातून दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले. बैठकीस केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिता वाघ तसेच जिल्ह्यातील आमदार, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर, महापालिका आयुक्त आदित्य जिवणे, पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जळगाव जिल्ह्यातील माहिती आणि न्यूज थेट आपल्या व्हाट्सअपवर लिंक वर क्लिक करा
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, सप्टेंबर २०२६ अखेरपर्यंत सर्व विकासकामांना प्रशासकीय मान्यता देऊन निधी खर्चाला गती द्यावी. प्रत्येक रुपया दर्जेदार विकासकामांसाठी खर्च होणे ही प्रशासनाची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महावितरण विभागाने मंजूर, पूर्ण व प्रलंबित कामांची छायाचित्रांसह माहिती समितीसमोर सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जिल्ह्यातील प्रलंबित विकासकामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रे सर्व सुविधांनी सुसज्ज ठेवण्याबरोबरच शवविच्छेदन गृहांची स्वच्छता व देखभाल नियमित करण्यावरही त्यांनी भर दिला.
वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी सलग चार वर्षे जिल्हा वार्षिक योजनेत अव्वल राहिल्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन केले. त्यांनी भुसावळ व वरणगाव तालुक्यातील प्रलंबित कामांचा आढावा घेत राज्य राखीव पोलीस दलासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले.
बैठकीत आमदार सुरेश भोळे यांनी महापालिका हद्दीत राहणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी योजनांचा लाभ मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांना तातडीने लाभ देण्याची मागणी केली. तर आमदार किशोर पाटील आणि चंद्रकांत पाटील यांनी गाळमुक्त अभियान प्रभावीपणे राबविण्याबाबत सूचना केल्या. विविध आमदारांनी आपल्या मतदारसंघातील प्रलंबित विकासकामांचा आढावा मांडला.
२९ शहीद जवान स्मारकांचे ऑनलाईन भूमिपूजन
बैठकीच्या प्रारंभी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून मंजूर करण्यात आलेल्या २९ शहीद जवान स्मारकांचे ऑनलाईन भूमिपूजन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
८३४.६२ कोटींच्या खर्चास मंजुरी, ९००.०५ कोटींच्या आराखड्यावर चर्चा
बैठकीत सन २०२५-२६ अंतर्गत ६७७ कोटींची सर्वसाधारण योजना, ९३ कोटींची अनुसूचित जाती उपयोजना आणि ६४.६२ कोटींची आदिवासी उपयोजना, अशा एकूण ८३४.६२ कोटी रुपयांच्या निधीच्या खर्चास मंजुरी देण्यात आली.
तसेच सन २०२६-२७ साठी ९००.०५ कोटी रुपयांच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या आराखड्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
जळगाव राज्यात प्रथम, १६ कोटींच्या प्रोत्साहनपर निधीची अपेक्षा
MahaSTRIDE PMU च्या प्राथमिक मूल्यांकनानुसार जळगाव जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर असून अंतिम मूल्यांकनानंतर जिल्ह्याला सुमारे १६ कोटी रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. याबद्दल जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन करणारा ठरावही बैठकीत मंजूर करण्यात आला.
बैठकीत नागरी भागातील अंगणवाडी इमारती, डोंगरी विभाग विकास कार्यक्रम, पर्यटन स्थळांना मान्यता, केळी निर्यात केंद्र (Banana Export Centre) उभारणी, केळी कटींग व पॅकेजिंग व्हॅन उपलब्ध करून देणे तसेच अहिराणी भाषेचा कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रणालीमध्ये समावेश करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबतच्या महत्त्वाच्या ठरावांनाही मंजुरी देण्यात आली.

0 टिप्पण्या