जळगाव | प्रतिनिधी जळगाव शहरात सुरू असलेल्या जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्याच्या पार्श्वभूमीवर महापौर दीपमाला काळे यांनी नागरिकांना सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे. शहरात काही ठिकाणी झाडे, फांद्या तसेच इतर वस्तू कोसळण्याच्या घटना घडत असल्याने नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे त्यांनी म्हटले आहे.
तसेच, सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या अफवा किंवा अप्रमाणित माहितीवर विश्वास न ठेवता केवळ प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
महापौर दीपमाला काळे यांनी सांगितले की, कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी तात्काळ जळगाव महानगरपालिका किंवा संबंधित आपत्कालीन यंत्रणेशी संपर्क साधावा. प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.
महापौरांनी दिलेल्या महत्त्वाच्या सूचना
- अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका.
- मोठी झाडे, वीजवाहिन्या व धोकादायक ठिकाणांपासून दूर राहा.
- वाहने सुरक्षित ठिकाणी उभी करा.
- अफवा किंवा अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नका.
- आपत्कालीन परिस्थितीत तातडीने प्रशासनाशी संपर्क साधा.
आपत्कालीन मदत क्रमांक
📞 ०२५७-२२३७६६६
📞 ०२५७-२२२४४४४
महापौरांनी नागरिकांना प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करत, "आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे कोणतीही आपत्ती प्रभावीपणे हाताळणे शक्य होईल. कृपया प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा आणि सुरक्षित राहा," असे म्हटले आहे.

0 टिप्पण्या