जळगाव | प्रतिनिधी सोशल मीडियावर गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणारे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करत स्टंटबाजीचे व्हिडिओ पोस्ट करणारे तसेच महिलांचा अवमान करणारे रील्स तयार करून प्रसारित करणाऱ्यांविरोधात जळगाव पोलिसांनी विशेष सायबर पॅट्रोलिंग मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत संशयास्पद आणि आक्षेपार्ह रील्सची तपासणी करून संबंधित व्यक्तींची ओळख पटवली जात असून त्यांना पोलिस मुख्यालयात समुपदेशनासाठी बोलावले जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळविण्याच्या हव्यासापोटी काही युवकांकडून गुन्हेगारांना नायकासारखे दाखवणारे, कायद्याचे उल्लंघन करणारे तसेच समाजात चुकीचा संदेश देणारे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर पोस्ट केले जात आहेत. अशा प्रकारच्या सामग्रीचा तरुणांवर विपरीत परिणाम होऊन गुन्हेगारीकडे आकर्षण निर्माण होण्याची शक्यता वाढत असल्याची चिंता पोलिसांनी व्यक्त केली आहे. याशिवाय, अशा व्हिडिओंमुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत असल्याचेही पोलिसांनी नमूद केले.
सायबर पॅट्रोलिंगद्वारे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील अशा रील्सवर सातत्याने लक्ष ठेवले जात असून संबंधित व्यक्तींना ओळख पटवून पोलिस मुख्यालयात समुपदेशनासाठी बोलावले जात आहे. या मोहिमेचा उद्देश केवळ दंडात्मक कारवाई करणे नसून, तरुणांना चुकीच्या प्रवृत्तींपासून परावृत्त करणे, समाजात कायद्याबाबत आदर निर्माण करणे आणि सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करण्याबाबत जनजागृती करणे हा आहे.
जळगाव जिल्ह्यातील माहिती आणि न्यूज थेट आपल्या व्हाट्सअपवर लिंक वर क्लिक करा

0 टिप्पण्या