एका मित्राला वाचवण्यासाठी गेलेल्या दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू; संपूर्ण अमळनेर शहरावर शोककळा
जळगाव | प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरालगत चोपडा रस्त्यावरील उड्डाण पुलाजवळील पाण्याने भरलेल्या खदाणीत सेल्फी काढण्याचा मोह तीन अल्पवयीन मित्रांच्या जीवावर बेतल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना मंगळवारी घडली. एका मित्राचा पाय घसरून तो खोल पाण्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी धावलेल्या इतर दोघांनाही पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तिघेही सुमारे ३० फूट खोल पाण्यात बुडाले. या दुर्घटनेत तिन्ही मित्रांचा जागीच मृत्यू झाला.
मृतांची नावे मानव बंटी रतनानी (१४), कार्तिक विकी उधवानी (१४) आणि दिनेश विजय पंजवानी (१७) अशी असून तिघेही अमळनेर येथील सिंधी कॉलनी परिसरातील रहिवासी होते. मानव आणि कार्तिक हे नववीचे विद्यार्थी होते, तर दिनेश हा प्रताप महाविद्यालयात अकरावी वाणिज्य शाखेत शिक्षण घेत होता. शिक्षणासोबत तो अर्धवेळ नोकरीही करत होता.
सेल्फी काढताना घडली दुर्घटना
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी सुमारे ४.५० वाजता तिघे मित्र फिरण्यासाठी खदाणी परिसरात गेले होते. खदाणीच्या मध्यभागी असलेल्या बेटासारख्या उंचवट्यावर कमी पाणी असल्याने ते चालत तेथे पोहोचले. याच ठिकाणी मोबाईलवर सेल्फी काढत असताना एका मुलाचा तोल जाऊन तो अचानक खोल पाण्यात पडला.
मित्राला वाचवण्यासाठी दुसऱ्या मुलाने त्याचा हात पकडण्याचा प्रयत्न केला; मात्र तोही पाण्यात ओढला गेला. दोघांना वाचवण्यासाठी तिसऱ्या मित्रानेही धाव घेतली. मात्र पाण्याची खोली आणि तळाचा अंदाज न आल्याने तिघेही काही क्षणांत पाण्यात बुडाले.
रिक्षाचालकाने दिली पोलिसांना माहिती
ही घटना खदाणीजवळून जात असलेल्या एका रिक्षाचालकाच्या निदर्शनास आली. त्याने तातडीने ११२ क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, नायब तहसीलदार सी. यू. पाटील, शहर तलाठी अशपाक पिंजारी, पोलीस कर्मचारी गणेश पाटील तसेच स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले.
स्थानिक युवकाने दाखवले धाडस
देवळी येथील दीपक मोरे यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून खदाणीत उडी मारत तिन्ही मुलांना बाहेर काढले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.
अमळनेरवर शोककळा
एकाच वेळी तीन अल्पवयीन मित्रांचा मृत्यू झाल्याने अमळनेर शहरासह सिंधी कॉलनी परिसरात शोककळा पसरली आहे. ग्रामीण रुग्णालयात मृतांच्या नातेवाईकांनी आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. कुटुंबीयांचा आक्रोश पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले.
पोलिसांचे नागरिकांना आवाहन
या दुर्घटनेनंतर पोलिसांनी नागरिकांना पावसाळ्यात पाण्याने भरलेल्या खदाणी, तलाव, धरणे, नाले आणि इतर धोकादायक जलाशयांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. पाण्याची खोली व तळाचा अंदाज येत नसल्याने अशा ठिकाणी सेल्फी काढणे किंवा विनाकारण जाणे टाळावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी केले.
🕯️ Jalgaon News कडून भावपूर्ण श्रद्धांजली
मानव बंटी रतनानी (१४)
कार्तिक विकी उधवानी (१४)
दिनेश विजय पंजवानी (१७)
ईश्वर दिवंगत आत्म्यांना चिरशांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे अपरिमित दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो.
ॐ शांती...! 🕯️🙏

0 टिप्पण्या