रावेर | प्रतिनिधी बुऱ्हानपूर–अंकलेश्वर चारपदरी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांतर्गत रावेर, यावल, फैजपूर आणि सावदा या चार शहरांतील समांतर मुख्य रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. या विकासकामांमुळे शहरांतील अंतर्गत वाहतूक अधिक सुरक्षित, सुलभ आणि गतिमान होणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या विकासकामांच्या नियोजनाबाबत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) च्या अधिकाऱ्यांसोबत सविस्तर आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत स्थानिक नागरिकांच्या मागण्या, वाहतुकीच्या समस्या आणि शहरांच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. लवकरच या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती देण्यात आली.
सध्या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी बुऱ्हानपूर–अंकलेश्वर चारपदरी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. वाढती वाहतूक आणि शहरांतील जागेची मर्यादा लक्षात घेऊन रावेर, यावल, फैजपूर आणि सावदा शहरांना वळसा घालणाऱ्या बायपास मार्गाची उभारणी करण्यात येत आहे.
जळगाव जिल्ह्यातील माहिती आणि न्यूज थेट आपल्या व्हाट्सअपवर लिंक वर क्लिक करा
या प्रकल्पामुळे रस्त्यांची गुणवत्ता सुधारण्याबरोबरच वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. व्यापारी, विद्यार्थी, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार रस्त्यांचा लाभ मिळणार आहे. तसेच शहरांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळून स्थानिक अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
प्रशासनाच्या माहितीनुसार, निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने प्रत्यक्ष काँक्रीटीकरणाची कामे सुरू केली जाणार असून, प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक नियोजन करण्यात येत आहे.

0 टिप्पण्या