जळगाव पोलीस मुख्यालयात नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे भव्य वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या उपक्रमात सुमारे ५५० स्वयंसेवकांनी सहभाग घेत २३२० झाडांचे वृक्षारोपण केले.
जळगाव : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे आज जळगाव पोलीस मुख्यालयात भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमात प्रतिष्ठानचे सुमारे ५५० श्री सदस्य सहभागी झाले होते. त्यांच्या सहभागातून पोलीस मुख्यालय परिसरात एकूण २३२० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान पर्यावरण संरक्षण, वृक्षसंवर्धन आणि हरित परिसर निर्मितीचा संदेश देण्यात आला. पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि प्रतिष्ठानचे सदस्य यांनी उत्साहात वृक्षारोपण करून झाडांची देखभाल करण्याचाही संकल्प केला.
यावेळी अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपअधीक्षक (गृह शाखा) संजय गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड तसेच राखीव पोलीस निरीक्षक प्रशांत सुगरवार यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमामुळे पोलीस मुख्यालय परिसर अधिक हिरवागार होणार असून समाजात पर्यावरण संवर्धनाबाबत सकारात्मक जनजागृती होण्यास मदत होणार आहे.
"झाडे लावा, झाडे जगवा!" या संदेशासह जळगाव पोलीस आणि नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांनी जिल्ह्याला पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश दिला.

0 टिप्पण्या