Translate

Ad Code

नशिराबादमध्ये दुर्दैवी घटना; घराच्या आवारातील हौदात बुडून ३ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

4 दिवसांपूर्वीच वाढदिवस साजरा; भवानीनगर परिसरात शोककळा



नशिराबाद | प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथे अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. राहत्या घराच्या आवारातील पाण्याच्या हौदात पडून बुडाल्याने आकांक्षा प्रवीण इंगळे (वय ३) या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे भवानीनगर परिसरात शोककळा पसरली असून कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घरातील सर्व सदस्य जेवणासाठी बसले असताना आकांक्षा नेहमीप्रमाणे घराच्या आवारात खेळत होती. खेळताना तिचा तोल जाऊन ती घरातील पाण्याच्या हौदात पडली. काही वेळ ती दिसून न आल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला.

शोधादरम्यान आकांक्षा हौदात आढळून आली. तिला तातडीने बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले.

चार दिवसांपूर्वीच वाढदिवस झाला होता

आकांक्षाचा जन्म १ जुलै २०२३ रोजी झाला होता. काही दिवसांपूर्वीच तिचा तिसरा वाढदिवस कुटुंबीयांनी मोठ्या उत्साहात साजरा केला होता. वाढदिवसाच्या आनंदाच्या आठवणी ताज्या असतानाच तिच्या अकाली निधनाच्या बातमीने संपूर्ण भवानीनगर परिसर सुन्न झाला आहे.

या दुर्दैवी घटनेनंतर कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या