Translate

Ad Code

रावेर नगरपालिकेचा धक्कादायक कारभार! जन्मदाखल्याऐवजी चक्क मृत्यूचा दाखला; मुलीच्या शाळा प्रवेशावेळी प्रकार उघड


रावेर | प्रतिनिधी रावेर नगरपालिकेच्या कारभारातील गंभीर निष्काळजीपणाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाघोड येथील रहिवासी नितीन देविदास महाजन हे आपल्या मुलीचा जन्मदाखला घेण्यासाठी रावेर नगरपालिकेत गेले असता, त्यांना जन्मदाखल्याऐवजी मृत्यूच्या नोंदीचा दाखला देण्यात आल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे हा दाखला २३ डिसेंबर २०२१ रोजी देण्यात आला होता. मात्र हा प्रकार तब्बल काही वर्षांनी मुलीच्या शाळा प्रवेशावेळी उघड झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, नितीन महाजन यांच्या मुली मोनिका हिचा जन्म रावेर येथील जानकी हॉस्पिटलमध्ये झाला होता. जन्माची नोंद नगरपालिकेत झाल्यानंतर त्यांनी नियमानुसार जन्मदाखल्यासाठी अर्ज केला. त्यानंतर तत्कालीन निबंधक युवराज गोयर यांच्या स्वाक्षरीने त्यांना दाखला देण्यात आला.

मात्र या दाखल्यात जन्माची माहिती असण्याऐवजी मृत्यूची तारीख, मृत्यूचे ठिकाण आणि मृत्यूशी संबंधित माहिती छापून आल्याचे समोर आले. हा गंभीर प्रकार तेव्हा उघडकीस आला, जेव्हा महाजन आपल्या मुलीचा जिल्हा परिषद केंद्र शाळा, वाघोड येथे इयत्ता पहिलीत प्रवेश घेण्यासाठी गेले. शाळेतील शिक्षकांनी दाखल्याची पडताळणी करताना ही गंभीर चूक निदर्शनास आणून दिली.

या प्रकारामुळे पालकांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला असून, संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.

दरम्यान, या प्रकरणाबाबत रावेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा संगीता महाजन यांनी हा प्रकार अत्यंत गंभीर आणि चुकीचा असल्याचे सांगितले. संबंधित प्रकरणाची चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल तसेच संबंधित पालकाला तातडीने नवीन आणि दुरुस्त जन्मदाखला देण्याचे निर्देश दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या