महाड | प्रतिनिधी राजर्षी शाहू महाराज जयंती व सामाजिक न्याय दिनानिमित्त महाड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकात आयोजित राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषद २०२६ मध्ये केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह हा सामाजिक न्यायासाठी झालेला ऐतिहासिक संघर्ष असल्याचे सांगितले. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव करत अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा त्यांच्या विचारांतून मिळते, असे प्रतिपादन केले.
विवेक विचार मंच, बार्टी, आर्टी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ (लोणेरे) तसेच विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संविधानाला अभिवादन करण्यात आले आणि संविधानाच्या सरनाम्याचे सामूहिक वाचन करण्यात आले.
शरणकुमार लिंबाळे यांचे आवाहन
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांनी समाजातील विविध घटकांमध्ये संवाद वाढविण्याची गरज व्यक्त केली. "सगळा समाज माझा आहे, ही भावना ठेवून सामाजिक ऐक्य वाढवले पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनुसार प्रत्येक क्षेत्रात कार्य केले पाहिजे," असे त्यांनी सांगितले.
चौदार तळे विकासाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी महाड येथील चौदार तळे नूतनीकरण व विकासकामाची माहिती देत, महाड सत्याग्रह शताब्दी वर्षानिमित्त येत्या २० मार्च रोजी पंतप्रधानांच्या हस्ते या विकासकामाचे उद्घाटन करण्याचे नियोजन असल्याचे सांगितले.
सामाजिक ऐक्याचा संदेश
पद्मश्री दादा इदाते यांनी छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत जातीभेद दूर करून समाज जोडण्याचे आवाहन केले.
सामाजिक न्याय पुरस्कारांचे वितरण
यावेळी महाराष्ट्रातील सामाजिक न्याय, समता आणि बंधुभावासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ११ संस्था व व्यक्तींना "राजर्षी शाहू महाराज सामाजिक न्याय पुरस्कार २०२६" केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
पुरस्कारार्थी :
ॲड. विजय लक्ष्मण गव्हाळे (बारामती)
मिलिंद मधुकर जाधव (पिंपरी-चिंचवड)
नागेश मोहन कंडारे (धुळे)
प्रा. डॉ. राजेश नारायणराव रगडे (छत्रपती संभाजीनगर)
नागसेन शामराव पुंडगे (परभणी)
डॉ. अनुप्रिता जाईबाई मोरे (बीड)
प्रभाकर मनोहर शिंदे (नागपूर)
शाम वसंत माळवंदे (खामगाव, बुलढाणा)
स्मिता सुशांत कवडे (मुंबई)
विजय अंबुजी जाधव (अंधेरी, मुंबई)
महादेव कृष्णाजी गोठणकर (राजापूर, रत्नागिरी)
परिषदेत मंजूर झाले तीन महत्त्वाचे ठराव
परिषदेत पुढील तीन ठराव एकमताने मंजूर करण्यात आले—
"एक गाव – एक पाणवठा, एक मंदिर, एक स्मशानभूमी" ही संकल्पना राज्यभर राबविण्याचा निर्धार.
संविधान, आरक्षण आणि सामाजिक समतेच्या मूल्यांवर आधारित एकसंघ भारत उभारण्याचा संकल्प.
केंद्र सरकारच्या नक्षलमुक्त भारत अभियानाचे अभिनंदन करत लोकशाही आणि शांततेच्या मार्गाने सामाजिक परिवर्तन घडविण्याचे आवाहन.
या परिषदेस केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे, पद्मश्री दादा इदाते, कुलगुरू प्रा. राजनिश कामत, आर्टीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार सुनील कांबळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
विवेक विचार मंचचे कार्यवाह महेश पोहनेरकर यांनी परिषदेचा उद्देश स्पष्ट केला, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश धायरकर यांनी केले. आर्टीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे यांनी आभार मानले.

0 टिप्पण्या