Translate

Ad Code

भुसावळ वीज प्रकल्पातील "300 कोटींचा घोटाळा दाबणार कोण?" विधान परिषदेत खडसेंचा स्फोट; SIT चौकशीची थेट मागणी

मुंबई | विशेष प्रतिनिधी राज्यातील वीज निर्मिती कंपनीतील कथित शेकडो कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा मुद्दा आज विधान परिषदेत जोरदार गाजला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी भुसावळ औष्णिक वीज केंद्रातील तब्बल 300 कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप करत सरकारला धारेवर धरले.

"काम न करता बिले काढली गेली, अर्धवट कामांचे पूर्ण पैसे अदा करण्यात आले. याचे पुरावे माझ्याकडे आहेत," असा दावा करत खडसेंनी सभागृहातच खळबळ उडवून दिली.



खडसे यांनी थेट प्रश्न उपस्थित केला की, "एका थर्मल पॉवर स्टेशनमध्ये 300 कोटी रुपयांचा गैरव्यवहार आढळत असेल, तर राज्यातील इतर सात जनरेशन प्रकल्पांमध्ये किती हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला असेल?"

त्यांनी पुढे म्हटले की, या प्रकरणातील आर्थिक फटका अखेर सर्वसामान्य वीज ग्राहकांनाच बसत आहे. त्यामुळे केवळ विभागीय चौकशी न करता विशेष तपास पथक (SIT) नेमून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी.

खडसेंनी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावेही सभागृहात घेतली. "अशा प्रकारचे व्यवहार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मंजुरीशिवाय होऊ शकत नाहीत. त्यामुळे या प्रकरणाची मुळापर्यंत चौकशी होणे आवश्यक आहे," अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खडसे यांनी सादर केलेल्या पत्रांवर चौकशी सुरू असल्याची माहिती दिली. "एका महिन्यात चौकशी पूर्ण केली जाईल. आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास SIT नेमण्यासही सरकार मागेपुढे पाहणार नाही," असे मुख्यमंत्री म्हणाले.

"कुठेही भ्रष्टाचार होत असेल तर त्यावर कारवाई झालीच पाहिजे," असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.

भुसावळ औष्णिक वीज केंद्राशी संबंधित कथित 300 कोटींच्या गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे आता राज्याच्या ऊर्जा क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, चौकशी अहवालात नेमके काय समोर येते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

जळगाव जिल्ह्यातील माहिती आणि न्यूज थेट आपल्या व्हाट्सअपवर लिंक वर क्लिक करा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या