'सत्यमेव जयते फार्मर कप 2026'ला मुख्यमंत्री फडणवीस यांची हिरवी झेंडी; उत्पादन 71% तर नफा 63% वाढल्याचा दावा
मुंबई | जळगाव न्यूज प्रतिनिधी
राज्यातील शेतीला नवसंजीवनी देण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी 'सत्यमेव जयते फार्मर कप 2026' या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आला. गटशेती हीच भविष्यातील शेतीची ताकद असल्याचे सांगत राज्यातील 18 हजार शेतकरी गटांमधील 2.50 लाख शेतकरी या चळवळीत सहभागी झाले असून, लवकरच 50 लाख शेतकऱ्यांना या अभियानाशी जोडण्याचे लक्ष्य असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, गेल्या वर्षी फार्मर कपमध्ये सहभागी झालेल्या शेतकरी गटांनी सोयाबीन, कापूस आणि मक्याच्या उत्पादनात तब्बल 71 टक्के वाढ नोंदवली. सामूहिक खरेदीमुळे प्रति एकर ₹1,584 ची बचत, तर सामूहिक श्रमामुळे सुमारे ₹6 हजार मजुरीची बचत झाली. यामुळे शेतकऱ्यांच्या निव्वळ नफ्यात 63 टक्क्यांची वाढ झाल्याचा दावा त्यांनी केला.
महिला शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा
राज्य सरकार लवकरच महिला शेतकरी विधेयक मंजूर करणार असून, शेतीच्या सातबाऱ्यावर नाव नसलेल्या महिलांनाही अधिकृत शेतकरी म्हणून मान्यता दिली जाणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.
एल निनोचे संकट; जलसंधारणावर भर देण्याचे आवाहन
यंदा एल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे आव्हान निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांना गावातील जलसंधारण, गाळ काढणे आणि पाणी साठवण क्षमता वाढविण्याच्या कामात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. 'गाळमुक्त धरण – गाळमुक्त शिवार' अभियानाला गती देण्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पाणी फाउंडेशनची लोकचळवळ
पाणी फाउंडेशनचे संस्थापक आमिर खान यांच्या पुढाकारातून राबविण्यात येणारा हा उपक्रम राज्य सरकारच्या सहकार्याने सार्वजनिक-खासगी भागीदारीत (PPP) राबविला जात असून, गटशेतीला आधुनिक तंत्रज्ञान आणि लोकसहभागाची जोड देणारे प्रभावी मॉडेल म्हणून पुढे येत आहे.
कार्यक्रमाला मंत्री दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार समाधान आवताडे, पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

0 टिप्पण्या