Translate

Ad Code

यावल तालुक्यातील साकळी प्राथमिक आरोग्य केंद्र पुन्हा बेवारस? दुपारी १ वाजता दवाखाना बंद; जखमी शेतमजुराला तासभर प्रतीक्षा


यावल | प्रतिनिधी 
"सरकारी दवाखान्यात उपचारासाठी जावे की जीव धोक्यात घालावा?" असा संतप्त सवाल उपस्थित करणारी घटना यावल तालुक्यातील साकळी प्राथमिक आरोग्य केंद्रात मंगळवारी (३० जून) घडली. दुपारी सुमारे १ वाजता प्राथमिक आरोग्य केंद्र बंद असल्याने जखमी शेतमजुराला उपचारासाठी तब्बल एक तास प्रतीक्षा करावी लागल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, विशाल माळी हा तरुण शेतमजूर शेतात काम करत असताना त्याच्या हाताला विळा लागून गंभीर जखम झाली. रक्तस्त्राव होत असल्याने तो तातडीने उपचारासाठी साकळी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाला. मात्र, तेथे डॉक्टर, नर्स किंवा इतर वैद्यकीय कर्मचारी उपस्थित नसल्याचा आरोप आहे.

घटनास्थळी केवळ एक कर्मचारी होता आणि तोदेखील जेवण करत असल्याने जखमी रुग्णाला तातडीची वैद्यकीय मदत मिळाली नाही. अखेर गावातील काही पदाधिकाऱ्यांना याची माहिती देण्यात आली. तरीही डॉक्टर व आरोग्य कर्मचारी येईपर्यंत रुग्णाला जवळपास एक तास वाट पाहावी लागली, असा आरोप करण्यात आला आहे.

या घटनेमुळे संतप्त झालेल्या विशाल माळी यांनी जळगाव न्यूजशी बोलताना सांगितले की, "सरकारी दवाखान्यात आलो हीच चूक झाली. खाजगी दवाखान्यात गेलो असतो तर तात्काळ उपचार मिळाले असते. सरकारी आरोग्य सेवेवर नागरिकांनी विश्वास ठेवायचा तरी कसा?"

दरम्यान, या प्रकरणी प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी (TMO) तथा तालुका प्रमुख राजू तडवी यांच्याशी जळगाव न्यूजने दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी फोन स्वीकारला नाही.

जळगाव जिल्ह्यातील माहिती आणि न्यूज थेट आपल्या व्हाट्सअपवर लिंक वर क्लिक करा

गंभीर प्रश्न उपस्थित...

  • दुपारच्या वेळेत प्राथमिक आरोग्य केंद्र बंद का होते?

  • आपत्कालीन रुग्ण आल्यास जबाबदार अधिकारी कुठे होते?

  • सरकारी सेवेत रुग्णांना तासन्तास वाट पाहण्याची वेळ का येते?

  • आरोग्य विभाग या प्रकाराची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करणार का?

साकळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील हा प्रकार पुन्हा एकदा ग्रामीण आरोग्य व्यवस्थेतील हलगर्जीपणावर प्रश्नचिन्ह उभे करत असून, जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.


तुमच्या परिसरातील सरकारी आरोग्य सेवांचा अनुभव कसा आहे? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा.

📢 स्थानिक बातम्या, तक्रारी किंवा व्हिडिओ पाठवण्यासाठी संपर्क करा. 7774943264

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या