Ticker

https://www.jalgaonnews.com/feeds/posts/default?alt=rss

Ad Code

Shendurni News 📰 शेंदुर्णी: नर्सच्या पतीचा संशयास्पद मृत्यू, पत्नीने खूनाचा आरोप केला


जळगाव न्यूज | जामनेर- शेंदुर्णी प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या नर्स शुभांगी शेलेकर यांच्या पतीचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत पतीचे नाव सुनील शेलेकर (वय ३६) असून त्यांच्या मृत्यूच्या पाठीमागे खून असावा, असा आरोप पत्नी शुभांगी यांनी केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून, अधिक तपास फॉरेन्सिक अहवालावर अवलंबून आहे.

ही घटना २ जून रोजी उघडकीस आली. शुभांगी शेलेकर या काही दिवसांपासून बुलडाणा येथे आपल्या माहेरी गेल्या होत्या. त्या परत आल्यानंतर त्यांनी पतीला वारंवार फोन केला, मात्र प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी घरमालक दीपक जाधव यांच्या पत्नीला संपर्क साधून निरोप द्यायला सांगितले.

निरोप देण्यासाठी गेलेले दीपक जाधव यांनी सुनील शेलेकर यांना घरात जमिनीवर पडलेल्या अवस्थेत पाहिले. त्यांनी तातडीने शेंदुर्णी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहित जोहरे यांना बोलावले. तपासणीनंतर डॉ. जोहरे यांनी त्यांना मृत घोषित केले.



सदर मृत्यू अत्यंत संशयास्पद होता. मृताच्या अंगावर अनेक ठिकाणी जखमा आढळून आल्या. यामुळे मृताच्या पत्नीने त्याचा खून झाल्याचा आरोप करत पोलिस निरीक्षकांना तक्रारपत्र दिले. त्यात "माझ्या पतीच्या शरीरावर गंभीर जखमा आहेत. त्यांचा खून झाला असून आरोपींना अटक करून योग्य शिक्षा द्यावी," अशी मागणी करण्यात आली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पहूरला पाठवला. मृत्यूची कारणमीमांसा अचूकपणे करता यावी यासाठी शवविच्छेदन फॉरेन्सिक लॅबमध्ये करण्यात आले. मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.


शेंदुर्णी आऊट पोस्टचे पोलिस उपनिरीक्षक नंदकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. "शेलेकर ट्रॅक्टरवरून पडले होते, त्यांना दवाखान्यात नेऊन पुन्हा घरी सोडले होते," असे स्पष्टीकरण ताब्यात घेतलेल्या दोघांपैकी एकाने पोलिसांना दिले. मात्र या जबाबावर शंका व्यक्त होत असून, फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतरच मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल, असे पीएसआय नंदकुमार शिंदे यांनी सांगितले.

दरम्यान, पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून संशयितांची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता स्थानिक नागरिकांत मोठी चर्चा सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या