Ticker

https://www.jalgaonnews.com/feeds/posts/default?alt=rss

Ad Code

NCP News : नागालँडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का : सातही आमदार एनडीपीपीत सामील; अजित पवार यांना राजकीय फटका



जळगाव न्यूज : नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व सात आमदारांनी पक्षत्याग करून थेट सत्ताधारी नागालँड डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी (NDPP) मध्ये प्रवेश केल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. हे पक्षांतर नागालँडचे मुख्यमंत्री नेफ्यू रिओ यांच्या उपस्थितीत अधिकृतपणे जाहीर करण्यात आले. या घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्राबाहेरील अस्तित्वाला मोठी सुरुंग लागली आहे. विशेष म्हणजे नागालँड हे एकमेव राज्य होते जिथे राष्ट्रवादी काँग्रेसला भक्कम पायाभूत आधार होता.

या पक्षांतरानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्याचा प्रयत्न आणखी गुंतागुंतीचा आणि कठीण झाला आहे. एखाद्या पक्षाला राष्ट्रीय दर्जा प्राप्त होण्यासाठी काही राज्यांमध्ये विशिष्ट टक्केवारीने मते व जागा मिळवणं आवश्यक असतं. नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत सात जागा जिंकून मोठं यश मिळवलं होतं. पण या सातही आमदारांनी पक्ष सोडल्यामुळे पक्षाचं अस्तित्वच संपुष्टात आलं आहे.

रविवारी पुण्यात असलेल्या अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना या घटनेवर प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, "माझी तब्येत बरी नव्हती आणि सकाळीच मला या पक्षांतराची माहिती मिळाली. दोन ते तीन महिन्यांपूर्वी हे आमदार मुंबईत माझी भेट घेण्यासाठी आले होते. त्यांनी त्यांच्या कामाकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार केली होती. 

अजित पवार यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी हे आमदार पक्षात ठेवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, असंतोषाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सत्ताधारी पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येते.

विशेष बाब म्हणजे या पक्षांतरात पक्षांतरविरोधी कायदा लागू होत नाही, कारण एकूण आमदारांची संख्या सात असून त्यांनी एकत्रितपणे पक्षत्याग केला आहे. भारतीय संविधानातील दहावी अनुसूची नुसार, जर दोनतृतीयांश आमदार एकत्र पक्षत्याग करतात, तर तो कायद्याच्या कक्षेत येत नाही.

या सातही आमदारांनी यापूर्वी अजित पवार यांना शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखालील मूळ राष्ट्रवादी काँग्रेसमधून वेगळं होऊन भाजपप्रणीत महायुतीत सामील होण्यासाठी पाठिंबा दिला होता. त्यामुळे हे आमदार अजित पवार गटाचे म्हणून ओळखले जात होते. मात्र आता त्यांनी एनडीपीपीमध्ये प्रवेश केल्याने अजित पवार यांच्यासाठी ही परिस्थिती आणखी अवघड बनली आहे.

या घटनाक्रमामुळे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला देशाच्या अन्य भागांमध्ये विस्तार करणे तसेच राष्ट्रीय राजकारणात स्थान निर्माण करणे यापुढे अधिक कठीण होणार आहे. नागालँडमध्ये गमावलेला बालेकिल्ला हे पक्षासाठी मोठे नुकसान आहे.

राजकीय विश्लेषकांच्या मते, या पक्षांतराचा परिणाम आगामी लोकसभा निवडणुकीतही दिसून येईल. राज्यातील व देशातील राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका मर्यादित होण्याची चिन्हे आहेत. पुढील काळात अजित पवार यांच्यासमोर पक्षाची साखळी टिकवून ठेवणे व नव्याने विश्वासार्ह नेतृत्व उभे करणे ही मोठी आव्हाने असतील.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या