Translate

Ad Code

अकोल्यात १० हजारांची लाच; जळगावच्या घरातून तब्बल २.९४ कोटींचे घबाड! एसीबीच्या छाप्यात रोकड, सोने आणि मालमत्तेचे कागद जप्त



जळगाव | प्रतिनिधी अकोला येथे १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडलेल्या सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी (वर्ग-१) किरण पुरुषोत्तम चौधरी यांच्या जळगावातील घरावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) टाकलेल्या छाप्यात तब्बल २ कोटी ९४ लाख ६४ हजार ८४७ रुपयांची बेहिशेबी मालमत्ता उघडकीस आली आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, चौधरी यांच्या जळगावातील गणेश कॉलनी येथील निवासस्थानातून १ कोटी ५३ लाख ८४ हजार ६३० रुपयांची रोकड, ६० लाख ९७ हजार १३५ रुपयांचे सोन्याचे दागिने आणि ६२ लाख १३ हजार रुपयांच्या मालमत्तेची कागदपत्रे जप्त करण्यात आली. एकूण जप्त मालमत्तेची किंमत २.९४ कोटी रुपयांहून अधिक आहे.

१० हजारांच्या लाचेपासून कोट्यवधींचा पर्दाफाश

२५ जून २०२६ रोजी अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने किरण चौधरी यांना १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली होती. या प्रकरणाच्या तपासादरम्यान त्यांच्या जळगावातील घरावर एसीबीने कारवाई करत मोठा आर्थिक साठा उघडकीस आणला.

सील तोडून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न

लाच प्रकरणानंतर चौधरी यांचे जळगावातील घर एसीबीने सील केले होते. मात्र २८ जूनच्या मध्यरात्री काही नातेवाईकांनी घराचे सील तोडून आत प्रवेश करत पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्याचवेळी एसीबीच्या निरीक्षक स्मिता नवघरे आणि त्यांच्या पथकाने संबंधितांना रंगेहाथ पकडल्याची माहिती समोर आली.

जळगावशी जुना संबंध

किरण चौधरी यांनी २९ सप्टेंबर १९९७ रोजी शासकीय सेवेत प्रवेश केला होता. ते २०२३ ते जून २०२५ या कालावधीत जळगाव येथे कार्यालय अधीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यानंतर त्यांची बदली अकोला येथे सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक अधिकारी म्हणून झाली होती. त्यांचे कायमस्वरूपी घर जळगावातील गणेश कॉलनी येथे आहे.

तपासाचा विस्तार होण्याची शक्यता

एसीबीकडून आता चौधरी यांच्या उत्पन्नाच्या स्रोतांची, मालमत्तेची आणि आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू असून, या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या