जळगाव | प्रतिनिधी पावसाळ्याच्या दिवसांत ग्रामीण भागात सर्पदंश, विंचूदंश आणि विषबाधेच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये आणि उपजिल्हा रुग्णालयांमध्ये आवश्यक उपचार सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेस (शरदचंद्र पवार) महाराष्ट्र प्रदेशच्या अध्यक्षा डॉ. रोहिणी एकनाथराव खडसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पावसाळ्यात शेतकरी, शेतमजूर, महिला मजूर आणि ग्रामीण भागातील नागरिकांना शेतीच्या कामासाठी दररोज बाहेर जावे लागते. याच काळात सर्पदंश, विंचूदंश तसेच कीटकनाशकांमुळे होणाऱ्या विषबाधेच्या घटनांमध्ये वाढ होते. अशा परिस्थितीत रुग्णांना तातडीने उपचार मिळणे अत्यंत आवश्यक आहे.
मात्र, जिल्ह्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये सर्पदंशावरील प्रतिविष (Anti Snake Venom), आवश्यक औषधे, प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी आणि रुग्णवाहिका सेवा अपुऱ्या असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. काही ठिकाणी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने, तर काही ठिकाणी प्रशिक्षित मनुष्यबळाच्या अभावामुळे रुग्णांना वेळेत उपचार मिळत नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
डॉ. रोहिणी खडसे यांनी जिल्हा प्रशासनाकडे पुढील महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत.
- जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये आणि उपजिल्हा रुग्णालयांमध्ये सर्पदंश, विंचूदंश व विषबाधेवरील उपचार सुविधा कुठे उपलब्ध आहेत, याची माहिती सार्वजनिक करावी.
- प्रत्येक आरोग्य केंद्रात Anti Snake Venom, विंचूदंशावरील औषधे, जीवनरक्षक इंजेक्शन्स आणि आवश्यक औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून द्यावा.
- सर्व आरोग्य केंद्रांमध्ये २४ तास प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी आणि रुग्णवाहिका सेवा कार्यरत असल्याची खात्री करावी.
- पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरावर विशेष कृती आराखडा तयार करून ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेत उपचार मिळतील, यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबवाव्यात.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, सर्पदंश किंवा विंचूदंशाच्या रुग्णांना वेळेत उपचार न मिळाल्यास जीवितहानी होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे प्रशासनाने या विषयाकडे अत्यंत गांभीर्याने पाहून आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, जेणेकरून ग्रामीण भागातील नागरिकांचे प्राण वाचवता येतील.
डॉ. रोहिणी खडसे यांनी पावसाळ्यातील संभाव्य आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन आरोग्य विभागाने तातडीने तयारी पूर्ण करावी आणि कोणत्याही नागरिकाला उपचाराअभावी जीव गमवावा लागू नये, यासाठी प्रभावी नियोजन करण्याची मागणी केली आहे.


0 टिप्पण्या