जळगाव | प्रतिनिधी राज्यात गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी वेग घेतला असतानाच, माजी मंत्री तथा विधान परिषदेचे सदस्य एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.
एकनाथ खडसे यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो पोस्ट करत,
"महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांना आज आला जन्मदिवस. त्यानिमित्त आपणास हार्दिक शुभेच्छा."
असा संदेश दिला आहे.
भाजप प्रवेशाच्या चर्चांमुळे पोस्टची चर्चा
गेल्या काही आठवड्यांपासून एकनाथ खडसे यांच्या भाजपमध्ये पुनर्प्रवेशाबाबत सातत्याने चर्चा सुरू आहे. जळगाव जिल्ह्यातील अनेक राजकीय घडामोडींमुळे या चर्चांना आणखी बळ मिळाले होते. मात्र, खडसे यांनी अलीकडेच आपण शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातच असल्याचे सांगत भाजप प्रवेशाबाबत स्पष्ट भूमिका मांडली होती.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त केलेल्या शुभेच्छा पोस्टमुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, खडसे आणि फडणवीस यांच्यात पूर्वी अनेक राजकीय मतभेद झाले होते. २०२० मध्ये भाजप सोडल्यानंतर खडसेंनी अनेकदा आपल्या पुनर्प्रवेशासंदर्भात विविध भूमिका मांडल्या होत्या.
मात्र, या शुभेच्छा पोस्टवरून कोणताही राजकीय निष्कर्ष काढण्यात आलेला नाही. ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त केलेली सार्वजनिक शुभेच्छा असल्याचेच सध्या स्पष्ट आहे.

0 टिप्पण्या