बोदवड | प्रतिनिधी बोदवड तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीविरोधातील कारवाईदरम्यान वाळूमाफियांनी थेट तहसीलदारांच्या पथकालाच लक्ष्य केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. २७) उघडकीस आली. कोल्हाडी शिवारातून जप्त केलेला वाळूने भरलेला डंपर तहसील कार्यालयाकडे आणत असताना आरोपींनी रस्ता अडवून तहसीलदारांना धमकावत सिनेस्टाईल पद्धतीने डंपर पळवून नेला.
मिळालेल्या माहितीनुसार, बोदवडचे तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे हे सोमवारी सायंकाळी महसूल पथकासह अवैध वाळू वाहतुकीविरोधात कारवाई करत होते. कोल्हाडी-बोदवड मार्गावर एमएच-२८-बीबी-७९३५ क्रमांकाचा वाळूने भरलेला डंपर आढळून आला. हा डंपर जप्त करून तहसील कार्यालयाकडे आणण्यात येत होता.
दरम्यान, नाडगाव उड्डाणपूल परिसरात एमएच-१४-जीए-८४४७ क्रमांकाची टीयूव्ही-३०० कार डंपरचा पाठलाग करत आली. कारमधून उतरलेल्या चार जणांसह दुचाकीवरून आलेल्या आणखी दोघांनी महसूल पथकाचा रस्ता अडवला. त्यांनी तहसीलदार आणि पथकातील कर्मचाऱ्यांना दमदाटी करत कारवाईत अडथळा निर्माण केला.
तहसीलदारांच्या फिर्यादीनुसार, आरोपींनी त्यांच्या अंगावर वाहन घालण्याचाही प्रयत्न केला. वेळीच बाजूला झाल्याने मोठा अनर्थ टळला. त्यानंतर आरोपींनी जप्त केलेला वाळूचा डंपर ताब्यात घेत घटनास्थळावरून पळ काढला.
तहसीलदारांची आपबिती
"अवैध वाळू वाहतूक करणारा डंपर पकडून कोतवाल व वाहनचालकांसह तहसील कार्यालयाकडे आणत असताना काही जणांनी रस्ता अडवून दमदाटी केली. माझ्या अंगावर वाहन घालण्याचाही प्रयत्न झाला. जीव वाचवण्यासाठी बाजूला झालो. त्यानंतर त्यांनी डंपर घेऊन पळ काढला," अशी माहिती तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांनी दिली.
या घटनेमुळे महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, वाळूमाफियांची वाढती दहशत समोर आली आहे. या प्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

0 टिप्पण्या