Translate

Ad Code

भरपावसात आयुक्तांचा धडक ॲक्शन! कचऱ्यात दगड टाकून वजन वाढवणारा मक्तेदाराचा कामगार रंगेहाथ पकडला

जळगाव | प्रतिनिधी जळगाव महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त आदित्य जीवने यांनी शनिवारी पहाटे भरपावसात दुचाकीवरून तब्बल पाच तास शहरातील स्वच्छता व्यवस्थेची अचानक पाहणी करत प्रशासनाला अक्षरशः धडकी भरवली. या पाहणीदरम्यान डी-मार्ट परिसरात कचरा वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरमध्ये वजन कृत्रिमरीत्या वाढवण्यासाठी कचऱ्यासोबत दगड भरले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. आयुक्तांनी संबंधित कामगाराला रंगेहाथ पकडत मक्तेदार कंपनीवर दंडात्मक कारवाईचे आदेश दिले, तर संबंधित स्वच्छता निरीक्षकाला कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश दिले.

सकाळी सात वाजताच आयुक्त जीवने यांनी स्वतःच्या अंगरक्षकासह दुचाकीवरून शहराच्या विविध भागांची पाहणी सुरू केली. त्यांच्या सोबत स्वीय सहायक गौरव पुराणिक, आरोग्य विभागाचे सहायक अभियंता समीर बोरोले, मुख्य स्वच्छता निरीक्षक रमेश कांबळे आणि इतर स्वच्छता निरीक्षकही दुचाकीवरून उपस्थित होते.




शहरातील कचरा स्पॉट्सवर कारवाईचे आदेश

गणेश कॉलनी, स्वातंत्र्य चौक, आर.आर. विद्यालय परिसर, सुभाष चौक, मेहरूण आणि डी-मार्ट परिसरातील कचरा साचणाऱ्या ठिकाणांची पाहणी करून आयुक्तांनी हे कचरा स्पॉट्स तातडीने बंद करण्याचे आदेश दिले. स्वच्छतेबाबत कोणतीही हलगर्जी सहन केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

'कचऱ्यात दगड' टाकण्याचा प्रकार उघड

पाहणीदरम्यान डी-मार्ट परिसरात कचरा वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टरमध्ये कचऱ्यासोबत दगड भरले जात असल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आले. वजन अधिक दाखवून आर्थिक फायदा मिळविण्याच्या उद्देशाने हा प्रकार होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आयुक्तांनी तात्काळ संबंधित कामगाराला रंगेहाथ पकडून मक्तेदारावर दंडात्मक कारवाईचे आदेश दिले. तसेच या प्रकाराकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी संबंधित स्वच्छता निरीक्षकाला नोटीस बजावण्याचे निर्देशही दिले.

दुकानदारांनाही कडक इशारा

शहरातील अनेक ठिकाणी दुकानांसमोर कचरा टाकला जात असल्याचे पाहून आयुक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ज्या दुकानांसमोर कचरा आढळेल, त्यांना प्रथम नोटीस दिली जाईल. त्यानंतरही परिस्थिती न सुधारल्यास थेट दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. भजेगल्ली परिसरात कचरा आढळल्याने तेथील दुकानांना नोटीस बजावण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

रस्त्यातच वाहनांची तपासणी

आयुक्तांची मोहीम केवळ पाहणीपुरती मर्यादित राहिली नाही. रस्त्यावर दिसणारे प्रत्येक कचरा संकलन वाहन, ट्रॅक्टर आणि घंटागाडी थांबवून त्यांनी प्रत्यक्ष तपासणी केली. कचरा संकलन, वाहतूक आणि स्वच्छता व्यवस्थेतील त्रुटी शोधून त्यावर तातडीने सुधारणा करण्याचे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

भरपावसात दुचाकीवरून केलेल्या या धडक पाहणीमुळे महानगरपालिका प्रशासन आणि स्वच्छता यंत्रणेत मोठी खळबळ उडाली असून, पुढील काही दिवसांत स्वच्छता व्यवस्थेवर अधिक कडक नियंत्रण राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या