Translate

Ad Code

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारा उपक्रम! ५३ विद्यार्थ्यांना सहाय्यभूत साहित्यांचे वाटप; समाजानेही पुढे यावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील



जळगाव | प्रतिनिधी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असून समाजातील सेवाभावी संस्था, उद्योग आणि दानशूर व्यक्तींनीही पुढाकार घेत दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी हातभार लावावा, असे आवाहन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

जळगाव पंचायत समितीच्या सभागृहात समग्र शिक्षा अभियानाच्या समावेशित शिक्षण विभागातर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जळगाव तालुक्यातील ३८ दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसार विविध सहाय्यभूत साहित्यांचे वितरण करण्यात आले. तसेच १५ मतिमंद विद्यार्थ्यांना विशेष एमआर किट देण्यात आले.

दिव्यांगांकडे दयेने नव्हे, समानतेने पाहा

पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, "दिव्यांगांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य आणि आयुष्यात निर्माण होणारा आत्मविश्वास हेच सर्वात मोठे समाधान आहे. प्रत्येक दिव्यांग विद्यार्थी समाजाची अमूल्य संपत्ती असून योग्य संधी, आधुनिक साधने आणि दर्जेदार शिक्षण मिळाल्यास ते प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करू शकतात."

दिव्यांग विद्यार्थ्यांकडे दयेच्या भावनेने नव्हे, तर समानतेच्या, सन्मानाच्या आणि विश्वासाच्या भावनेने पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. शासन, प्रशासन, शिक्षक, पालक आणि समाज यांनी एकत्रितपणे कार्य केल्यास दिव्यांग विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे अधिक सुलभ होईल, असेही त्यांनी सांगितले.

व्हीलचेअरपासून डिजिटल श्रवणयंत्रांपर्यंत साहित्यांचे वितरण

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना व्हीलचेअर, सीपी व्हीलचेअर, डिजिटल श्रवणयंत्रे, टीएलएम किट, रोलॅटर, वॉकिंग स्टिक तसेच इतर आवश्यक सहाय्यभूत साहित्यांचे वाटप करण्यात आले. विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांना आवश्यक साधने उपलब्ध करून त्यांच्या शिक्षणाला आणि दैनंदिन जीवनाला बळकटी देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

यांची होती उपस्थिती

कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी अजित तडवी यांनी केले. त्यांनी समग्र शिक्षा अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध सुविधा यांची माहिती दिली.

यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी निलेश पाटील, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र सपकाळे, गटशिक्षणाधिकारी अजित तडवी, माजी सभापती जनाआप्पा कोळी यांच्यासह शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या