Translate

Ad Code

नाशिक : आधार कार्ड नसल्याने शिक्षणापासून वंचित मुलांना मिळाला दिलासा; प्रशासनाच्या पुढाकाराने शाळेचे दरवाजे खुले


नाशिक | प्रतिनिधी

भटक्या-विमुक्त समाजातील मुलांना केवळ आधार कार्ड आणि इतर आवश्यक कागदपत्रांच्या अभावामुळे शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी प्रशासनाने घेतलेल्या संवेदनशील भूमिकेमुळे अनेक मुलांच्या आयुष्यात आशेचा नवा किरण निर्माण झाला आहे.

गेल्या आठवड्यात अनुलोम संस्थेच्या प्रतिनिधींनी नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेऊन भटक्या-विमुक्त समाजातील नागरिकांना आधार कार्ड, जात प्रमाणपत्र, रेशन कार्ड यांसारख्या मूलभूत कागदपत्रांअभावी येणाऱ्या अडचणी मांडल्या. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार अप्पर तहसीलदार अमोल निकम यांनी तत्काळ या विषयाची दखल घेतली.

पाथर्डी येथील पोतराज समाजाच्या वस्तीतील मुलांची समस्या

नाशिक शहरालगत पाथर्डी गावाजवळील पोतराज समाजाच्या वस्तीतील काही विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नसल्याने त्यांचे शाळेत प्रवेश रखडले होते. ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर अप्पर तहसीलदार अमोल निकम यांनी शिक्षणाधिकारी डॉ. मीता चौधरी यांच्याशी संपर्क साधत आवश्यक सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या.

यानंतर अनुलोमचे जनसेवक निखिल पोरजे आणि विजय रणपिसे यांनी वस्तीवर जाऊन पालकांशी संवाद साधला आणि विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी आवश्यक प्रक्रिया सुरू केली.

शिक्षणाधिकाऱ्यांचा संवेदनशील पुढाकार

ठरल्याप्रमाणे विद्यार्थी नवीन कपडे परिधान करून सकाळपासून शाळेत जाण्यासाठी सज्ज होते. शिक्षणाधिकारी डॉ. मीता चौधरी स्वतः आपल्या वाहनाने वस्तीवर पोहोचल्या. त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना शाळेत नेऊन त्यांच्या प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण केली.

शाळेत पोहोचल्यानंतर अनुलोमच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याचे गुलाबपुष्प देऊन आणि औक्षण करून स्वागत केले. या प्रसंगामुळे संपूर्ण वस्तीत आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि शिक्षणाची मिळालेली नवी संधी उपस्थितांसाठी भावनिक क्षण ठरली.

प्रशासनाच्या संवेदनशीलतेचे उदाहरण

या उपक्रमामुळे केवळ काही मुलांचे शाळेत प्रवेश झाले नाहीत, तर प्रशासन आणि सामाजिक संस्थांनी समन्वयाने काम केल्यास वंचित घटकांपर्यंत शासकीय यंत्रणा प्रभावीपणे पोहोचू शकते, याचाही प्रत्यय आला.

या उपक्रमासाठी अनुलोम संस्थेने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अप्पर तहसीलदार अमोल निकम आणि शिक्षणाधिकारी डॉ. मीता चौधरी यांचे विशेष आभार मानले आहेत.


Jalgaon News | समाजातील सकारात्मक घडामोडींना प्राधान्य

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या