Translate

Ad Code

Nashik MLC Result : 'नाशिकचा निकाल आमच्यासाठी धक्कादायक'; चौकशी करणार, गिरीश महाजन यांची मोठी प्रतिक्रिया

जळगाव | प्रतिनिधी  नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी पहिली प्रतिक्रिया देत हा निकाल महायुतीसाठी धक्कादायक असल्याचे म्हटले आहे. नाशिकमध्ये महायुतीकडे स्पष्ट संख्याबळ असतानाही पराभव झाल्याने या निकालामागील कारणांची सखोल चौकशी केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.



महाजन म्हणाले, "नाशिकचा निकाल आमच्यासाठी अत्यंत धक्कादायक आहे. महायुतीचा उमेदवार विजयी व्हावा यासाठी आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले. जळगावमध्ये निवडणूक असतानाही मी बहुतांश वेळ नाशिकमध्येच होतो. सर्व मतदारांशी संवाद साधला, बैठका घेतल्या आणि मतदानाच्या दिवशीही बूथवर उपस्थित होतो. तरीही अपेक्षित निकाल मिळाला नाही."

"साडेचारशेहून अधिक मते असतानाही पराभव"

महाजन यांनी सांगितले की, नाशिकमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीच्या घटक पक्षांकडे साडेचारशेहून अधिक मतांचे संख्याबळ होते. मात्र प्रत्यक्ष निकालात महायुतीच्या उमेदवाराला अपेक्षेपेक्षा कमी मते मिळाली. "हे कसे घडले, कोणत्या स्तरावर चूक झाली, याचा निश्चितपणे शोध घेतला जाईल," असे त्यांनी नमूद केले.

"एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार"

या निकालाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगत महाजन म्हणाले की, "या पराभवाची कारणमीमांसा होणे आवश्यक आहे. पक्ष नेतृत्वासोबत चर्चा करून संपूर्ण बाबीची चौकशी केली जाईल."

दराडे यांच्या आरोपांवर उत्तर

महायुतीचे उमेदवार अजित दराडे यांनी विश्वासघाताचा आरोप केल्याबाबत विचारले असता महाजन म्हणाले, "पराभवानंतर भावना तीव्र असतात. मात्र मी कधीही दुहेरी भूमिका घेणारा माणूस नाही. माझ्या ४० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत मी एक बोलून दुसरे केलेले नाही. माझ्या स्वभावात किंवा पक्षाच्या संस्कृतीत विश्वासघाताला स्थान नाही."

"जळगावमध्ये राज्यातील सर्वाधिक मताधिक्य"

जळगाव विधानपरिषद निवडणुकीचा उल्लेख करत महाजन म्हणाले की, "राज्यातील १७ विधानपरिषद निवडणुकांमध्ये जळगावमध्ये महायुतीला सर्वाधिक मते मिळाली. नंदकिशोर महाजन यांना विक्रमी मताधिक्य मिळाले. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांनी एकजुटीने काम केल्यामुळे हा निकाल शक्य झाला."

संजय राऊतांनाही प्रत्युत्तर

शिवसेना (ठाकरे गट)चे खासदार संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर देताना गिरीश महाजन म्हणाले, "विरोधकांनी आधी स्वतःच्या पराभवाचे आत्मपरीक्षण करावे. अनेक ठिकाणी त्यांचे खातेही उघडले नाही. त्यामुळे आमच्यावर टीका करण्याऐवजी त्यांनी त्यांच्या निकालाचा विचार करावा."

नाशिकच्या निकालानंतर महायुतीत अंतर्गत पडसाद उमटले असून या पराभवामागील कारणांचा शोध घेण्यासाठी पक्षस्तरावर हालचाली सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या