जळगाव | प्रतिनिधी जळगाव विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी दणदणीत विजय मिळवल्यानंतर शिवसेना (शिंदे गट)च्या बंडखोर उमेदवार राहिलेल्या रेश्मा काळे यांनी पहिली प्रतिक्रिया देताना नाशिक विधानपरिषद निवडणुकीच्या निकालावरून तीव्र नाराजी व्यक्त केली.
रेश्मा काळे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाचा मान राखत त्यांनी जळगावमध्ये आपली उमेदवारी मागे घेतली आणि महायुतीचा धर्म पाळत अधिकृत उमेदवारासाठी प्रामाणिकपणे काम केले. मात्र, नाशिकमध्ये महायुतीच्या संदर्भात तशीच भूमिका घेतली गेली नसल्याचा आरोप त्यांनी केला.
त्यांनी म्हटले की, "आमच्या साहेबांनी आम्हाला कधीही पाठीवर वार करायला शिकवले नाही. आम्ही कट्टर शिवसैनिक म्हणून आदेशाचे पालन केले. महायुती म्हणून जे काम करायचे होते ते पूर्ण निष्ठेने केले. मात्र नाशिकमध्ये तसे झाले नाही. तिथे आमच्या उमेदवाराला अपेक्षित सहकार्य मिळाले असते तर निकाल वेगळा लागला असता."
काळे यांनी पुढे दावा केला की, नाशिकमध्ये महायुतीच्या उमेदवाराला पूर्ण ताकदीने पाठिंबा मिळाला नसल्याने तेथे पराभव झाला. "आम्ही जळगावमध्ये महायुतीचा धर्म पाळला. पण नाशिकमध्ये कुठेतरी विश्वासघात झाला, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे," असे त्या म्हणाल्या.
भाजपकडून वारंवार विश्वासघात होत असल्याचा प्रश्न विचारला असता त्यांनी, "याबाबत अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. आम्ही निष्ठावंत शिवसैनिक म्हणून आमची भूमिका पार पाडली. हीच आमची खरी ओळख आहे," असे उत्तर दिले.
पुढील काळातील भूमिकेबाबत बोलताना रेश्मा काळे म्हणाल्या, "महायुतीचा धर्म पाळण्याचे आदेश आम्ही मानले. मात्र आता आमच्या आत्मसन्मानाचाही प्रश्न निर्माण झाला आहे. भविष्यात समोरून जशी वागणूक मिळेल, तसे उत्तर देण्याची मुभा वरिष्ठांनी द्यावी, अशी आमची अपेक्षा आहे."
दरम्यान, जळगाव विधानपरिषद निवडणुकीत रेश्मा काळे यांनी उमेदवारी मागे घेतल्यानंतर महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला. त्यानंतर केलेल्या या वक्तव्यामुळे महायुतीतील अंतर्गत नाराजीची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

0 टिप्पण्या