भुसावळ ते यावल या सुमारे ८ किलोमीटर लांबीच्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. या रस्त्यावरून दररोज शेकडो दुचाकी, चारचाकी तसेच अवजड वाहने ये-जा करतात. मात्र रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका वाढला होता.
या गंभीर परिस्थितीबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या होत्या. अखेर संबंधित विभागाने दखल घेत अंजाळे गावाजवळून रस्त्याच्या डागडुजीचे काम सुरू केले आहे. खड्ड्यांमध्ये खडी व मुरूम टाकून बुजवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून कामाचा वेग वाढवण्यात आला आहे.
मात्र, स्थानिक नागरिकांनी कामाच्या दर्जाबाबत चिंता व्यक्त केली आहे. रस्त्याच्या डागडुजीचे काम करताना दर्जेदार साहित्य वापरावे, योग्य रोलर करून मजबुतीकरण करावे आणि काम अर्धवट न ठेवता संपूर्ण रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी वाहनचालक व नागरिकांनी केली आहे.
विशेष म्हणजे, हा रस्ता ग्रामीण भागासाठी महत्त्वाचा असून या मार्गावरून शाळकरी विद्यार्थी, कामगार, शेतकरी तसेच व्यापाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर ये-जा सुरू असते. त्यामुळे काम वेळेत आणि गुणवत्तापूर्ण होणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.
जाहिरात आणि बातम्यांसाठी संपर्क - 7774943264

0 टिप्पण्या