जळगाव | प्रतिनिधी ज्येष्ठ नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्याने राज्याच्या राजकारणात नवी उत्सुकता निर्माण केली आहे. खडसे यांच्या संभाव्य भाजप घरवापसीच्या चर्चांदरम्यान आता भाजप नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांना अधिकृत निमंत्रण देण्यात आल्याने "खडसे-महाजन पुन्हा एकाच मंचावर दिसणार का?" अशी चर्चा रंगू लागली आहे.
गिरीश महाजनांना अधिकृत निमंत्रण
जामनेर येथे खडसे समर्थक सुनील नेवे आणि आमदार खडसे यांचे स्वीय सहायक योगेश कोलते यांनी मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेत अमृत महोत्सवी सोहळ्याची निमंत्रण पत्रिका सुपूर्द केली. यावेळी त्यांनी महाजन यांना कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहण्याची विनंती केली.
या भेटीनंतर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
महाजन काय निर्णय घेणार?
यापूर्वी पत्रकारांशी बोलताना गिरीश महाजन यांनी, "निमंत्रण मिळाल्यानंतर कार्यक्रमाला जाण्याबाबत निर्णय घेऊ," असे स्पष्ट केले होते. आता अधिकृत निमंत्रण मिळाल्यानंतर ते सोहळ्याला उपस्थित राहणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अमित शाहांच्या उपस्थितीचीही चर्चा
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह या अमृत महोत्सवी सोहळ्याला उपस्थित राहू शकतात, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. या चर्चेला एकनाथ खडसे यांनीही दुजोरा दिल्याने कार्यक्रमाचे राजकीय महत्त्व आणखी वाढले आहे.
अमित शाह उपस्थित राहिल्यास राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांची उपस्थितीही या कार्यक्रमात पाहायला मिळू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
भाजप घरवापसीच्या चर्चांना पुन्हा वेग
एकनाथ खडसे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मध्ये प्रवेश केला होता. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या भाजपमध्ये पुनरागमनाच्या चर्चांनी पुन्हा वेग घेतला आहे. त्यामुळे अमृत महोत्सवी सोहळा हा केवळ वाढदिवसाचा कार्यक्रम न राहता राजकीय शक्तिप्रदर्शनाचा मंच ठरणार का, याची उत्सुकता वाढली आहे.
सर्वांचे लक्ष मुक्ताईनगरकडे
आता या सोहळ्यात गिरीश महाजन उपस्थित राहतात का, अमित शाह येतात का आणि एकनाथ खडसे भविष्यातील राजकीय वाटचालीबाबत काही संकेत देतात का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. आगामी राजकीय समीकरणांच्या दृष्टीने हा कार्यक्रम महत्त्वाचा ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

0 टिप्पण्या