भुसावळ - शिर्डी साईबाबा आणि राजस्थानमधील खाटुश्याम दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी दिलासादायक बातमी आहे. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने साईनगर शिर्डी–बिकानेर साप्ताहिक विशेष रेल्वे सेवेच्या संचालन कालावधीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही विशेष रेल्वे सेवा आता १ मार्च २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे.
याआधी ही गाडी मर्यादित कालावधीसाठीच धावणार होती. मात्र, भाविकांचा वाढता प्रतिसाद आणि आरक्षणाची वाढती मागणी पाहता रेल्वे प्रशासनाने या सेवेची मुदत वाढवली आहे. साईनगर शिर्डी–बिकानेर तसेच बिकानेर–साईनगर शिर्डी या दोन्ही दिशेतील विशेष गाड्यांना ही मुदतवाढ लागू असणार आहे.
ही गाडी मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, उज्जैन, कोटा, जयपूर, रिंगस आदी प्रमुख स्थानकांवर थांबते. शिर्डी आणि खाटुश्याम ही दोन्ही देशातील महत्त्वाची धार्मिक तीर्थक्षेत्रे असल्याने भाविकांसाठी ही रेल्वे सेवा अत्यंत सोयीची ठरत आहे. विशेष म्हणजे, मुदतवाढ देताना वेळापत्रक, थांबे किंवा डब्यांच्या रचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे आधीच प्रवासाचे नियोजन केलेल्या भाविकांना कोणतीही अडचण येणार नाही.
.png)
0 टिप्पण्या