जळगाव Jalgaon News – जळगाव जिल्ह्यातील नगरपालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या युतीबाबत अद्यापही संमिश्र चित्र दिसत आहे. या संदर्भात जलसंपदामंत्री गुलाबराव पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
गुलाबराव पाटील म्हणाले की, “जिल्ह्यातील 18 नगरपालिकांपैकी सहा ते सात ठिकाणी युती होण्याची शक्यता आहे. एरंडोल, पारोळा, धरणगाव, नशिराबाद, मुक्ताईनगर आणि सवदा या ठिकाणी प्राथमिक चर्चाचं चित्र दिसत आहे. मात्र अजून अंतिम निर्णय झालेला नाही.”
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी दिलेल्या प्रस्तावावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, “भुसावळसाठी आम्हाला प्रस्ताव आला होता, पण आम्ही अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे, आणि त्यांच्या मतानुसारच पुढील निर्णय घेतला जाईल.”
पुढे बोलताना पाटील म्हणाले, “भाजप हा आमचा प्रमुख प्रतिस्पर्धी पक्ष आहे. पण आम्ही महायुतीत आहोत, त्यामुळे काही ठराविक मर्यादा पाळाव्या लागतात.”
अजित पवार यांच्यावर होणाऱ्या आरोपांविषयी ते म्हणाले, “आम्ही कोणालाही टार्गेट करत नाही. त्यांच्या विरोधात जे बोलतात, ते त्यांच्याच जवळचे लोक आहेत. मुलासाठी बाप खोटं बोलतोय की नाही, हे लोकांनी ठरवावं.”
खडसे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना पाटील म्हणाले, “त्यांनी त्यांच्या काळात राजीनामा दिला होता, पण अजित दादांचा विषय वेगळा आहे. दोन्ही प्रकरणांची तुलना होऊ शकत नाही.”
#JalgaonNews #GulabraoPatil #Mahayuti #NCP #AjitPawar #MaharashtraPolitics

0 टिप्पण्या