जळगाव येथे पत्रकारांशी बोलताना खडसेंनी नाव न घेता जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी सांगितले की, "मला पालकमंत्री करा" अशा लाचारपणाने व लोचटपणे काही मंत्री मागणी करत आहेत. हे वर्तन एका मंत्र्याला शोभणारे नाही. स्वाभिमानाने पालकमंत्रीपद मिळाले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
नाशिक जिल्ह्यासाठी पालकमंत्री पदाची निवड अद्याप न झाल्याने ते पद सध्या चर्चेत आहे. यामध्ये गिरीश महाजन यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे. मात्र, खडसेंनी या संदर्भात स्पष्ट मत व्यक्त करत, "कशासाठी हवाय पालकमंत्रीपद? जिथे नियुक्ती झाली तिथे काम करा. हे राज्य आपले आहे. विशेष कारणासाठी पालकमंत्री व्हायचं, ही काहींची भूमिका स्पष्ट दिसते," अशी जोरदार टीका केली.
ते पुढे म्हणाले की, "मला पालकमंत्री करा" असा आग्रह धरण्यामागे काहीतरी हेतू असतो. कुणी पालकमंत्री झालं म्हणजे कुंभमेळ्याचं काम त्यालाच मिळालं पाहिजे असं नाही. त्यामुळे हे पद मिळवण्यासाठी लाचारपणा नको," असा सल्लाही त्यांनी दिला.
खडसेंच्या या विधानामुळे पुन्हा एकदा त्यांच्यात आणि गिरीश महाजन यांच्यातील राजकीय संघर्ष समोर आला आहे. दोघेही पूर्वी एकाच पक्षात असूनही आज वेगवेगळ्या राजकीय भूमिकांमध्ये आहेत आणि एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडत नाहीत.
या वक्तव्यामुळे नाशिक पालकमंत्री पदावरून सुरू असलेल्या अंतर्गत चढाओढीला आणखी उधाण आले असून, आगामी निर्णयाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.
0 टिप्पण्या